“टाकी फुल नाही तर रस्त्यावर गाडी बंद!”; पेट्रोल-डिझेल टंचाईने महाराष्ट्रात हाहाकार, पंपांवर नागरिकांची झुंबड


पुणे : राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या भीषण टंचाईने नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. कुठे ‘नो स्टॉक’चे फलक, कुठे किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, तर कुठे इंधनासाठी थेट हाणामारी… अशा संतप्त आणि तणावपूर्ण वातावरणात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. परभणी, बुलढाणा आणि वाशिममध्ये इंधनटंचाईचा सर्वाधिक फटका बसत असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, वाढत्या इंधन दरांविरोधात पुण्यात आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मनसेलाही पोलिसांनी परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

परभणी जिल्ह्यात इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शहरासह ग्रामीण भागात वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या पंपांवर इंधन उपलब्ध आहे, तिथे सकाळपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. काही नागरिकांनी तासन्तास प्रतीक्षा करूनही इंधन न मिळाल्याची नाराजी व्यक्त केली.

बुलढाणा जिल्ह्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. जिल्ह्यातील अनेक पंप गेल्या काही दिवसांपासून बंद असून नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्याच्या वादातून मारहाणीची घटना घडल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. पोलिसांसमोरच झालेल्या या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाशिममध्ये डिझेल टँकर पोहोचताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. रांगेवरून झालेला किरकोळ वाद पुढे हाणामारीत बदलल्याने काही काळ पेट्रोल पंप परिसरात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मदतीसाठी पोलिसांना संपर्क करूनही तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, काही पेट्रोल पंपांनी आधी इंधन नसल्याचे सांगून विक्री बंद ठेवली आणि दरवाढीनंतर अचानक इंधन विक्री सुरू केल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करून नफेखोरी केली जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दुसरीकडे, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात पुण्यात आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला होता. मात्र मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू करत आंदोलनाला परवानगी नाकारली. त्यामुळे राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!