लेक लाडकी योजना आता अधिक सोपी! सरकारी कार्यालयात हेलपाटे नको; पालकांना थेट करता येणार ऑनलाईन अर्ज…

मुंबई : महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून राबवण्यात येणारी ‘लेक लाडकी’ योजना आता अधिक सुलभ करण्यात आली आहे. अधिकाधिक पात्र मुलींना योजनेचा लाभ जलद मिळावा, यासाठी अर्ज प्रक्रियेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
आता पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.

अर्ज प्रक्रिया होणार अधिक सोपी
नवीन प्रक्रियेमुळे अर्जदारांना वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही. योजनेतील लाभार्थ्यांच्या आई-वडिलांची ई-केवायसी करण्यात येणार असून, आवश्यक माहिती प्रणालीद्वारे आपोआप प्राप्त होणार आहे.


तसेच, लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) जमा केली जाणार आहे. त्यामुळे बँक खाते किंवा अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहिती पुन्हा पुन्हा भरावी लागणार नाही. यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित होणार आहे.
अर्ज करण्याची मुदत किती?
1 एप्रिल 2023 पासून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.
मुलींना मिळणार 1 लाख 1 हजार रुपये
‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
जन्मानंतर – 5,000 रुपये
इयत्ता पहिलीत प्रवेश – 6,000 रुपये
इयत्ता सहावीत प्रवेश – 7,000 रुपये
इयत्ता अकरावीत प्रवेश – 8,000 रुपये
वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर – 75,000 रुपये
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक कुटुंबे आणि सरकारने निश्चित केलेल्या वार्षिक उत्पन्नासह इतर पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.