मोठी बातमी! ठाकरे बंधू एकत्र येणार…राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव; म्हणाले, आमच्यातील भांडणं छोटी पण..

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे.
काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी राज ठाकरे यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात थेट प्रश्न विचारला होता.
राज ठाकरे म्हणाले, कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत.
त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त इच्छेचा आहे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे अप्रत्यक्षरीत्या युतीसाठी हात पुढे केला आहे. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत राज यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शिवसेना आणि तुमची पुन्हा युती होऊ शकते का? असा प्रश्न मुलाखतीदरम्यान महेश मांजरेकर यांनी विचारला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “एकत्र येणं कठीण नाही. आपण महाराष्ट्रासाठी लार्जर पिक्चर पाहणं गरजेचं आहे आणि ते मी पाहतच आहे.
माझं तर म्हणणं आहे की, महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षातील सर्व मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, अशी भावना राज यांनी व्यक्त केली. तसंच महाराष्ट्राच्या भल्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करण्यास मला अडचण नसल्याचं त्यांनी सुचवलं आहे.