याला वेड म्हणावं की…एकाच फ्लॅटमध्ये एक-दोन नाहीतर तब्बल ३५० मांजरी, पुण्यातील हडपसरच्या सोसायटीतील घटना..

पुणे : पुण्यातील हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने तब्बल ३५० मांजरी घरात पाळल्याने संपूर्ण सोसायटीमध्ये भीतीचे आणि त्रासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हडपसर येथील मार्वल बॉन्टिक को- ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत नवव्या मजल्यावर साडेतीन बीएचके सदनिकेत मागील पाच ते सहा वर्षांपासून मांजरी पाळल्या जात असल्याची तक्रार सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. त्यानंतर महापालिका आणि पोलिस बंदोबस्तात सदनिकेची पाहणी करण्यात आली. त्यावेळी या सदनिकेत ३०० पेक्षा जास्त मांजरी आढळून आल्या आहेत.
सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मांजरांमुळे सतत येणारा उग्र वास, ड्रेनेजमधून जाणारे दूषित पाणी आणि त्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा प्रचंड आवाज यामुळे शेजारी राहणाऱ्यांना त्रास होत आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी मांजरांचे मोठ्या आवाजात ओरडणे, तसेच त्यांचा घाण वास संपूर्ण परिसरात पसरतो आहे, अशी तक्रार रहिवाशांनी केली आहे.

दरम्यान, रहिवाशांनी २०२० मध्येच पुणे महानगरपालिका आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी संबंधित महिलेकडे ५० मांजरी असल्याचे समोर आले होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत हा आकडा ३५० वर पोहोचला आहे. रहिवाशांच्या तक्रारीनंतर पालिका प्रशासनाने महिलेवर कारवाईसाठी नोटीस बजावली आहे.

रहिवाशांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, या मांजरांमुळे काही आजार पसरू शकतात, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई करावी. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे. या विचित्र घटनेमुळे पुणेकरांमध्ये चर्चेला उधाण आले असून, आता महानगरपालिकेची पुढील कारवाई काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.