लाडकी बहीण योजनेत बदल होणार?; उत्पन्नाच्या माहितीसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

गेल्या सात महिन्यांपासून महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ देखील घेत आहे. २०२४ ते जानेवारी २५ पर्यंत अनेक महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि म्हणूनच आता फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्या तारखेला पैसे जमा होतील याची उत्सुकता देखील महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लागलेली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणांमुळे दोन लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय तूट, पुरेशा निधीचा अभाव यामुळे सरकारला आखडता हात घ्यावा लागत आहे.

याचदरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत काही बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
दरवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच लाडकी बहीण योजनेचा पुढील लाभ दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे.
प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे. अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांना इथून पुढे योजनेचा लाभ घेता येणार नाही. काही बहिणींनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतला आणि हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्यांनी स्वत:हून योजनेचा लाभ घेणे बंद केले.