बडतर्फ IAS पूजा खेडकरबाबत मोठा निर्णय!! सुप्रीम कोर्टाने दिले महत्वाचे आदेश, जाणून घ्या…

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेली भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) बडतर्फ माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तिला सर्वोच्च न्यायालयाने १७ मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. यामुळे आता तिला अटक करता येणार नाही.

पूजा खेडकरला जानेवारीमध्ये झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. आता ते १७ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला खेडकरने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
खंडपीठाने यावर उत्तर दाखल करण्यास दिल्ली पोलिसांना अतिरिक्त वेळ दिला आहे. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा याबाबत कामकाज बघत आहेत. खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यामुळे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

खेडकर हिच्यावर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण राज्यात गाजले होते. याबाबत खेडकरच्या वकिलाने अटकेपासून संरक्षण वाढवून देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने यावर तीन आठवड्यांनंतर सुनावणी होईल, असे सांगितले.
दरम्यान, त्या चौकशीत सहकार्य करत आहेत तोपर्यंत अंतरिम संरक्षण कायम ठेवावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी आजच्या सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी दोन आठवड्याचा वेळ मागितला.
दरम्यान, या प्रकरणी सखोल तपासाची गरज आहे. प्रथमदर्शनी खेडकरचे वर्तन प्रथमदर्शनी प्रशासकीय व्यवस्थेला फसवण्याच्या उद्देशाने असल्याचे दिसून आल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत तपास सुरू आहे.