उरुळी कांचनला वीज तोडल्याने वायरमनला लोखंडी रॉडने मारहाण..


उरुळी कांचन : वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून उरुळी कांचन येथील महावितरण कार्यालयातील वायरमनला एका व्यक्तीने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती येथील साईनगर परिसरात आज सोमवारी (ता. 10) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

निलेश ताकणे (वय -42, रा. भेकराईनगर) असे वायरमनचे नाव आहे. तर मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. या हल्ल्यात वायरमन ताकणे हे जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश ताकणे हे उरुळी कांचन येथील महावितरण कार्यालयात शाखा नंबर 1 मध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहेत. ते वीजबिल वसुलीसाठी उरुळी कांचनमधील साईनगर परिसरात फिरत होते. यावेळी या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातील वीजपुरवठा लाईटबिल न भरल्याने ताकणे यांनी खंडित केला होता. सदर व्यक्तीने ताकणे यांनी खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडून घेतला होता. याची माहिती ताकणे यांना मिळाली होती.

दरम्यान, ताकणे यांनी परत जाऊन पुन्हा वीजपुरवठा खंडित केला. यावेळी चिडलेल्या व्यक्तीने शेजारी पडलेल्या लोखंडी रॉडने वायरमन ताकणे यांना मारहाण केली. या घटनेत ताकणे हे जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर ठिकाणी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!