समृद्धी महामार्गावरील प्रवास होणार अजूनच सुखकर!! राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला मोठा निर्णय…

पुणे : देशातील सर्वाधिक लांबीचा द्रुतगती मार्ग असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर २१ ठिकाणी नव्याने सुविधांची उभारणी होणार आहे. याबाबत अनेक दिवसांपासून प्रवासी मागणी करत होते. अखेर याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

यामध्ये ‘वे-साइड ॲमिनिटीज’ म्हणून ओळख असलेल्या या सुविधांमध्ये आता अत्याधुनिक स्वच्छतागृहही असेल. समृद्धी महामार्गावर थांबण्यासाठीच्या सुविधा नव्हत्या. त्यामुळे अखंड प्रवास केल्याने रस्ते संमोहन होऊन अपघाताच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. यामध्ये अनेकांचे जीवही गेले.
यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) रस्त्यालगतच्या सुविधांची तयारी सुरू केली आहे. यामुळे अपघात कमी होतील अशी आशा आहे. समृद्धी महामार्ग हा एकूण ७०१ किमी लांबीचा आहे.

त्यातील ६२५ किमी लांबीचा मार्ग आतापर्यंत तीन टप्प्यांत वाहनचालकांसाठी सुरू झाला आहे. आता महामंडळाने २१ ठिकाणी स्वच्छतागृहे उभे करण्यासाठी निविदा काढली आहे. तसेच एकूण २० ठिकाणी अशा सुविधा उभ्या होत आहेत. त्या ठिकाणी चार हेक्टरवर किमान ५० कोटी रुपये गुंतवून या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

तसेच किमान फूड कोर्ट, अर्थात खाण्या-पिण्याची सोय तातडीने करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यामुळे प्रवास करताना गैरसोय देखील होणार नाही. एकूण २.१० कोटी रुपये त्यासाठी खर्च केले जाणार आहेत. तसेच कंत्राट मिळाल्यापासून १५ दिवसांत ही सुविधा संबंधित कंत्राटदाराला उभी करायची आहे.