गंभीर आजाराची ३६ औषधे ड्युटी फ्री! अर्थसंकल्पात मोदी सरकारचा मोठा निर्णय…

नवी दिल्ली : निर्मला सीतारामन यांनी आज बजेटमध्ये मोठी घोषणा केली. यामध्ये रुग्णांसाठी केंद्र सरकारने गंभीर आजारावरील ३६ औषधे ड्युटी फ्री केली आहेत. त्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा अर्थसंकल्प मांडताना रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे.

यामुळे येणाऱ्या काळात याच्या किमती स्वस्त होणार आहेत. सीतारामन यांनी ३६ जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे.
सहा जीवन रक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी ५ टक्के करण्यात आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घोषणा शेतकऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, उद्योगांपासून आरोग्य सेवांपर्यंत विविध वर्गांसाठी महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलेल्या मोठ्या भेटीपासून ते स्टार्टअप्ससाठी दिलेल्या सहाय्यपर योजना, तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी नव्या धोरणांची घोषणा यामध्ये समाविष्ट आहे.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. आता किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्जाची मर्यादा ३ लाख रुपये असलेल्या शेतकऱ्यांसाठी ती ५ लाख रुपये केली जाणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळवणे सोपे होईल आणि त्यांच्या कृषी कार्यांमध्ये मदत होईल.
याशिवाय, मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या उत्पन्नास स्थिर ठेवण्यासाठी एक कार्यक्षम फ्रेमवर्क आणला जाईल. तसेच मेडिकल क्षेत्रात देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षापासून देशभरातील मेडिकल कॉलेजमध्ये १०,००० नवीन जागा वाढवण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मेडिकल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संधी अधिक विस्तृत होतील. तसेच, देशातील पाच आयआयटी संस्थांच्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जाणार आहे, ज्यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला चालना मिळेल.