यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली…

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांना लवकरच सुरुवात होत आहे. या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी ते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत माहिती दिली. यंदा दहावी-बारावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर सुरू होत आहे.
बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे परीक्षांचा निकाल देखील १५ मेपर्यंत जाहीर होईल, असे भुसे यांनी स्पष्ट केले. तसेच या परीक्षांसाठी राज्यभरातून जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होत होता. तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर केला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत राज्य मंडळाच्या नियोजनामुळे बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर केला जात आहे.
