पुणे जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोरात! आतापर्यंत ४४ लाख ३४ हजार ५१६ टन उसाचे गाळप, जाणून घ्या….

पुणे : सध्या राज्यात साखर कारखाने सुरू असून मोठ्या प्रमाणावर गाळप केले जात आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १४ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. यामध्ये ३७ लाख ९१ हजार ८९९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

सरकारने १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे साखर कारखान्याचा गळीत हंगाम धीम्यागतीने सुरू झाला आहे. आता मात्र कारखान्यांनी वेग घेतला आहे. पुणे जिल्ह्यात साखर उतारा सरासरी ८.५५ टक्के एवढा आहे. यामुळे येणाऱ्या काळात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी उशिराने झालेल्या पावसामुळे जवळपास सव्वा लाख हेक्टरवर उसाच्या लागवडी झाल्या असल्याची स्थिती आहे. यंदा गाळपासाठी सुमारे एक लाखाच्या आसपास ऊस उपलब्ध आहे. अनेक कारखाने ऊस तोडणीसाठी मोठी यंत्रणा उभारत असून लांबून ऊस गाळपासाठी आणला जात आहे.

पुणे जिल्ह्यातील पूर्व, उत्तर भागात उसाचे दरवर्षी उत्पादन घेतले जाते. गाळपामध्ये बारामती अॅग्रोने सर्वाधिक आघाडी घेतली आहे. या कारखान्याने ८ लाख ८४ हजार २०१ टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ६ लाख ४१ हजार २० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. तर साखर उतारा सरासरी ७.१६ टक्के एवढा आहे.
दरम्यान, चालू गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखान्यांनी केले आहे. असे असताना ऊस शेतात जुलैपासून पाणी राहिल्याने उसाची फारशी वाढ झाली नसल्याने उसाच्या उत्पादनात घट होत असल्याचे चित्र आहे. यावेळी पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्याची अडचण झाली.