HSRP नंबर प्लेटकडे दुर्लक्ष महागात पडणार! 1 जुलैपासून दंडासोबतच RTOची अनेक कामेही अडकणार


पुणे : राज्यात जुन्या वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) संदर्भात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. 30 जूननंतर मुदत संपताच 1 जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांविरोधात राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

विशेष म्हणजे, ही कारवाई केवळ दंडापुरती मर्यादित राहणार नाही. HSRP नसलेल्या वाहनांची अनेक प्रशासकीय कामेही प्रलंबित ठेवली जाणार आहेत. वाहनाची मालकी बदलणे, पत्ता अद्ययावत करणे, वाहनावर कर्जाची नोंद करणे किंवा काढणे, पुनर्नोंदणी, वाहनातील बदलांची मंजुरी अशा विविध सेवा HSRP पूर्ण होईपर्यंत मिळणार नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, अजूनही मोठ्या संख्येने वाहनधारकांनी HSRP बसविण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसांत नोंदणी केंद्रांवर गर्दी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने वाहनधारकांना अधिकृत माध्यमातूनच स्लॉट बुक करून नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ज्यांनी 30 जूनपूर्वी अधिकृतरीत्या अपॉइंटमेंट निश्चित केली आहे, त्यांना नंबर प्लेट बसेपर्यंत कारवाईत काही प्रमाणात सवलत मिळू शकते. मात्र, अपॉइंटमेंट न घेता मुदत उलटल्यानंतर वाहन रस्त्यावर आणल्यास तपासणीदरम्यान दंडाला सामोरे जावे लागू शकते.

HSRP ही बनावट नंबर प्लेट आणि वाहन चोरीसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था मानली जाते. त्यामुळे प्रत्येक पात्र वाहनावर ही प्लेट बसविणे बंधनकारक असून, वाहनधारकांनी नियमांचे पालन करून भविष्यातील दंड आणि प्रशासकीय अडचणी टाळाव्यात, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!