Weather Update : काळजी घ्या! राज्यात थंडीचा जोर कायम, तापमानाचा पारा ४ अंशावर, जाणून घ्या आजचा हवामान अंदाज…

Weather Update : संपूर्ण राज्यात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. किमान तापमानात घट झाल्याने राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये बोचरी थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी तीव्र झाल्याने राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे.

राज्यात धुळ्यात सगळ्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. धुळ्यातील तापमानाचा पारा ४.१ अंश सेल्सियसवर नोंदवण्यात आला. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात १५ व १६ म्हणजे आज थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर पसरणार असून तापमान नीचांकी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र वगळता येत्या २४ तासांत किमान तापमान ८ ते १४ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. Weather Update

दरम्यान, १९ डिसेंबर सिंधुदुर्गात, कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या घाट भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.