RTE 2025 : आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू होणार, ‘या’ दिवशी होणार नोंदणीचा शुभारंभ, जाणून घ्या….

RTE 2025 : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविली जाणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यातच सुरू करण्याचा प्राथमिक शिक्षण विभागाचा प्रयत्न होता. मात्र,अद्याप मंत्रीमंडळ विस्तार न झाल्यामुळे शालेय शिक्षण मंत्री अस्तित्वात नाहीत.

प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत अंतिम मंजूरी शिक्षण मंत्री यांच्याकडून दिली जाते.त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तारात आरटीई प्रवेश प्रक्रिया अडकली आहे. अशातच आरटीई प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असून, जानेवारी महिन्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल. तर, मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होईल. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे. RTE 2025

तसेच शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेषकरून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. संबंधित प्रवेश प्रक्रिया दरवर्षी उशिरा सुरू होते. त्यातच ऑनलाइन यंत्रणेतील दोष, शासनाकडून मान्यता देण्यास होणारी दिरंगाई अशा विविध कारणांमुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडते.
दरम्यान, त्यामुळे एकीकडे डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असली, तरी आरटीई प्रवेश प्रक्रियेला मात्र मुहूर्त लागत नव्हता. अखेर यंदा संबंधित प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.