Crime News : आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा अपहरण करून खून; शिंदवणे घाटात निर्जनस्थळी मृतदेह आढळल्यानंतर खूनाचा प्रकार उघडकीस…

Crime News उरुळीकांचन : सत्ताधारी भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्यांचा मृतदेह शिंदवणे (ता. हवेली) घाटात निर्जनस्थळी सोमवारी (दि .९ ) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आढळला आहे.

सतीश सादबा वाघ (वय-५५) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी त्यांचा मुलगा ओंकार सतीश वाघ (वय-३८) यांनी अपहरणाची हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश वाघ हे शेवाळवाडी येथील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. वाघ हे ब्लु बेरी हॉटेलसमोर सोमवारी (ता.०९) सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉक करीत होते. यावेळी अचानक एक चारचाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली. त्या गाडीतून दोन अपहरणकर्ते बाहेर आले. त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीत बसवून अपहरण केल्याची घटना घडली होती.

या घटनेची माहिती मिळताच, पुणे शहर अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. व त्वरित तपासाच्या दिशेने पथके तयार करून आरोपींच्या मागावर रवाना केले होते.