Ratan Tata : रतन टाटांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, सर्वसामान्यांना घेता येणार पार्थिवाचं अंत्यदर्शन…

Ratan Tata : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर वरळीतील माता रमाई आंबेडकर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. रतन टाटा यांच्या निधानानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.

त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रतन टाटा यांचे अधिकृत निवासस्थान कुलाब्यातील सॉमरसेट हाऊस इथं आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांचं पार्थिव निवासस्थानी आणण्यात आले आहे.
रतन टाटा यांच्या सॉमरसेट हाउसमध्ये सध्या फक्त कुटुंबिय आहेत. रतन टाटा यांचे चुलतभाऊ नोएल टाटा यासह टाटा कुटुंबातील सदस्य माया,नेवील आणि लिह आता सॉमरसेट हाऊसमध्ये असून कुलाबा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे.

आम्ही सर्वांना विनंती करतो की त्यांनी गेट ३ वरून एनसीपीए लॉनमध्ये प्रवेश करावा आणि बाहेर जाण्यासाठी गेट २ चा वापर करावा असेल. एनसीपीएच्या आवारात पार्किंगची जागा उपलब्ध नसणार आहे. दुपारी ४ वाजता, त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी स्मशानभूमी, डॉ ई मोसेस रोड, वरळी येथील प्रार्थना हॉलमध्ये अंतिम प्रवासाला निघेल, असे टाटा समूहाने निवेदनात म्हटले आहे. Ratan Tata
दरम्यान, रतन टाटा यांच्या निधनानंतर मिळालेल्या प्रेम आणि सहानुभूतीबद्दल टाटा कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. “आम्ही, त्यांचे भाऊ, बहिणी आणि कुटुंबीय, ज्यांनी त्यांचे कौतुक केले त्यांच्याकडून अपार स्नेहाने सांत्वन स्विकारतो. ते यापुढे आपल्यात नसले तरी त्यांची नम्रता, औदार्य आणि हेतूचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे टाटा समूहाने म्हटलं आहे.