Daund : दौंड विधानसभेला निष्ठावंतांना कात्रजचा घाट! राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष रमेश थोरात यांच्या हाती देणार तुतारी…

Daund : लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच भाजपला मोठा धक्का बसला आहे. इंदापुरातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच येत्या १५ ऑक्टोबरला ते प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट देखील घेतली आहे. थोरात यांनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवार यांना मोठा धक्का बसणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी पुण्यातील निसर्ग कार्यालयात मुलाखती नुकत्याच पार पडल्या. शनिवारी मराठवाड्यातील अनेक इच्छुकांनी शरद पवार यांना भेटून उमेदवारीसंबंधी चर्चा केली. तर रविवारी रात्री बारामती शेजारील दौंड विधानसभेच्या इच्छुक उमदेवारांची एक बैठक पवार यांनी मोदीबागेतील निवासस्थानी घेतली. Daund
दरम्यान, या बैठकीला माजी आमदार रमेश थोरात, शरद पवार गटाचे दौंड तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, डॉ. भरत खळदकर, वंदना मोहिते, दिग्विजय जेधे हे पाचही इच्छुक उमेदवार उपस्थितीत होते. दौंड विधानसभेच्या जागेसंदर्भात आणि उमेदवारीसंदर्भात शरद पवार यांनी पाचही इच्छुक उमेदवारांशी चर्चा केली.