Maharashtra Politics : महायुतीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला! संघाच्या बैठकीत सगळं ठरलं, 25 जागांवर विशेष लक्ष..

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली जात आहे. राज्यात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्या सामना पाहायला मिळणार आहे.

तसेच महायुतीत जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी कोअर कमिटीची बैठक पार पडली. येत्या विधानसभेत भाजपा १५० ते १६० जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महायुतीचे जागावाटप ठरण्याची माहिती आहे.
महायुतीच्या जागावाटपात विद्यमान आमदारांच्या त्या -त्या पक्षाला जागा देण्यात आल्या आहेत. भाजपाकडे १०५, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे प्रत्येकी ४० हुन अधिक आमदार आहेत. त्यामुळे या जागा वगळता उर्वरीत जागांसाठी तिन्ही पक्षात चर्चा सुरु आहे.

भाजप १५०-१६० जागा लढण्यावर ठाम आहे. तर उर्वरित १३०-१३५ जागा शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला दिल्या जाऊ शकतात. मागील निवडणुकीत भाजपा १०५ जागा जिंकत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनला होता. मात्र यंदाची निवडणूक भाजपाला सोपी नाही.
लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर भाजपाला गेल्यावेळच्या १०५ जागा निवडून आणणंही कठीण आहे. त्यात जिंकण्याचा विश्वास असलेल्या ८५ जागा वगळता इतर २५ जागांवर भाजपाने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी संघाच्या आणि भाजपाच्या बैठकांमध्ये रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांचे दौरे वाढले आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यात ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील विविध विभागातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
त्याशिवाय भाजपाच्या कोअर कमिटीशीही जागावाटप आणि इतर रणनीती यांच्यावर चर्चा करणार आहेत. भाजपाने ज्या जागा धोक्यात आहेत अशाठिकाणी विशेष लक्ष देण्याचंही ठरवल्याची माहिती आहे.