कवडीपाट ते कासुर्डी महामार्गांची आवस्था विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गाजणार ! बेवारस पडलेला रस्ता प्रचारात ठरणार कळीचा मुद्दा ….


उरुळीकांचन : पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी दरम्यानचा महामार्ग प्रवासासाठी अतिशय धोकादायक झाला आहे. या महामार्गावरील टोलवसुलीची मुदत मार्च २०१९रोजी संपल्यानंतर महामार्ग देखभाल -दुरुस्तीचा अतिशय गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असून देखील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षिततेच्याअनास्थेपायी बेवारस झाला आहे. मागणी पाच वर्षाच्या काळात या महामार्गाच्या गुणवत्तेकडे डोळेझाक झाल्याने शेकडो नाहक मुडदे या ठिकाणी पडले आहे. त्यामुळे या राजकीय व शासकीय अनास्थेचा मुद्दा विधानसभेच्या निवडणुकीत गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

 

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे पहिल्या टप्प्यात कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यानचे चौपदरीकरण २००४ साली पूर्ण झाले आहे. या चौपदरीकरणानंतर ३१ मार्च २०१९ अखेर या रस्त्याची टोलवसुलीची मुदत संपली आहे. त्यानंतर हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वर्ग झाला आहे. दरम्यान कासुर्डी ते सोलापूर दरम्यान चा महामार्ग विकसित झाल्यानंतर या महामार्गावर टोलवसुली सुरू आहे. दरम्यान हा संपूर्ण महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीत आला असल्याने या महामार्गावरील कवडीपाट ते कासुर्डी दरम्यानचा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. परंतु या विभागाकडून सातत्याने या महामार्गाला दुर्लक्षित करण्याचा गंभीर प्रकार होऊन  स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने रस्त्याची आवस्था अतिशय भयानक झाली आहे.

 

या दरम्यानच्या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असून देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्ग दुरुस्तीला एजन्सी नेमणुक करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या नावाखाली मोठा कालावधी घालविल्याने हा महामार्ग देखभाल – दुरुस्तीतही दुर्लक्षित राहिला आहे.या महामार्गावरील दोन्ही बाजूंनी गेल्या वीस वर्षात नागरीकरण वाढले आहे. रस्त्यावर अतिक्रमणांचा भराव तयार झाला आहे.रस्त्यालगत बांधकामे वाढलीअसल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यासहीत ड्रेनेजची व्यवस्था राहिली नाही. अशा वेळी रस्त्यावर खड्डे पडणे ,रस्त्याची चाळण होणे,पाण्याचे डबके तयार होणे अशी भयावक आवस्था निर्माण झाली आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हा रस्ता ताब्यात येऊन अतिशय छातूर -मातूर काम एजन्सीकडे करून तात्पुरती मलम पट्टी रस्त्याला देण्यात देत आहे. मात्र रस्त्याची गुणवत्ता राखली जात नसल्याची स्थिती आहे. या मार्गाला राष्ट्रीय दर्जा असूनही डांबरीकरणाला गुणवत्ता नाही, मार्गाला सलगता नाही, मार्गाच्या मार्गिकेची उंची वाढविणे गरजेचे असताना कार्यवाही पडून आहे.तुटलेले सुरक्षा कठडे , बॅरीगेट्स , सर्व्हिस रोडची देखभाल ,डिव्हाडर उंची ,शहरी भागात रात्रीची विजेची व्यवस्था आदी समस्यांनी जोखडला आहे.

 

या महामार्गाची मुदत मार्च २०१९ ला संपूनही स्थानिक लोकप्रतिनिधींनी महामार्ग सुधारणेकडे फारसे लक्ष न पुरविल्याने या महामार्गाची दैना पाच वर्षे थांबली नाही.लोकांचे मुडदे पडत गेले,परंतु शासन व्यवस्थेला आजही जाग आली नसल्याची स्थितीआहे. या गंभीर प्रश्नाकडे एकतर पत्रकार तर दुसरे पोलिस यांनी पाठपुरावा केला परंतु ल़ोकप्रतिनीधींनी झोपेचे सोंग घेतल्याने हा जिव्हाळाचा विषय बाजूला पडला आहे. परंतु आता विधानसभा निवडणूकीला मात्र प्रचारात हा मुद्दा तापणार असून ‘जवाब दो ‘म्हणून जनतेला उत्तरे द्यावी लागणार आहेत.

 ‘एनएचएआय’ कडे महामार्ग कशासाठी ?

कवडीपाट ते कासुर्डी दरम्यानचा महामार्ग हा टोलवसुलीची मुदत संपल्यानंतर जवळपास दिड वर्षे हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग (रामा) यांच्या अखत्यारीत होता.नंतर संपूर्ण महामार्ग सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला. वास्तविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही संस्था राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प उभे करण्याचे नियोजन, प्रकल्प तयार करणे ही काम करते परंतु या संस्थेकडे महामार्गासाठी स्वतंत्र निधी मिळविण्याची तरतूद नाही. मग या संस्थेकडे या महामार्गाचे हस्तांतरण कशासाठी हा प्रश्न आहे.

 

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!