बारा हजार रुपयांसाठी पळापळ कशाला करताय ! यवत पोलिसांचा तक्रारदार माजी उपसरपंचांना अजब उत्तर..!!

यवत : चोरी व मारहाण झालेली तक्रार देण्यासाठी यवत पोलीस ठाण्यात गेलेल्या माजी सरपंचाना पोलिसांनी चक्क तुमच्या बारा हजार रुपयांसाठी कुठे एवढी पळापळ करायला लावता असे उत्तर दिले आहे. गेलेली कागदपत्रे तुम्हाला नव्यानी काढता येतील आम्हाला येऊन चौकशी करुद्या असे म्हणत अद्यापपर्यंत गुन्हाही दाखल करून घेतला नसल्याची माहिती डाळिंब (ता. दौंड) येथील माजी उपसरपंच पांडुरंग काळे यांनी दिली.



मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन जवळ असलेल्या डाळिंब गावचे माजी उपसरपंच पांडुरंग काळे यांचे उरुळी कांचन येथे विठोबा ज्वेलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. बुधवारी (ता. 08) त्यांच्या घरी झोपले असताना मध्यरात्री त्यांच्या घरामध्ये असणारी महत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग त्यामध्ये खरेदीखत जात प्रमाणपत्र इत्यादी महत्त्वाची कागदपत्र आणि त्यांच्या पॅन्टच्या खिशातील साडेबारा हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यानी तेथून पोबारा केला.
यावेळी काळे यांनी गावातील नागरिकांना फोन द्वारे चोरट्यांची माहिती देऊन सावध केले. यावेळी गावातीलच नारायण बाळकृष्ण गायकवाड त्यांच्या पत्नी बाहेर झोपलेले असताना त्यांच्या गळ्यामधील सोन्याचे दागिने हिसकवण्याचा देखील प्रयत्न या चोरांनी केला होता. यावेळी तेथील राहुल काळू म्हस्के हे बाथरूमसाठी गेल्याने त्यांच्या घराचे दार उघडे होते. घराचे दार उघडलेल्या अवस्थेत असलेले पाहून चोरट्यांनी बाहेरील लावलेला बल्ब काढून घरामधील कपाट उघडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी बाथरूमवरून परत येत असलेले राहुल म्हस्के यांना पाहून दोन चोरटे त्यांच्या मागे धारदार शस्त्र घेऊन धावून गेले. यावेळी गायकवाड यांनी तेथून ओरडत पळ काढला. मात्र चोरट्यानी त्यांना दगड फेकून मारला त्यामुळे त्यांच्या बरगडीस जोराचा मार लागला. त्यानंतर गावातील लोक जागे झाल्याने आणि आरडाओरडा झाल्याने चोरांनी तेथून पळ काढला असल्याची माहिती माजी उपसरपंच पांडुरंग काळे व गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, सदर घटनेबाबत यवत पोलीस ठाण्यात काळे हे गेले असता आम्हाला येऊन चौकशी करुद्या, तुमच्या बारा हजार रुपयांसाठी कुठे एवढी पळापळ करायला लावता गेलेली कागदपत्रे तुम्हाला नव्यानी काढता येतील असे उलट उत्तर यवत पोलीस ठाण्यातील कर्मचारी यांनी दिले असल्याची माहिती माजी उपसरपंच पांडुरंग काळे यांनी दिली.
उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक रात्रीच्या सुमारास बाहेर झोपलेले असतात. बाहेर झोपलेले असताना बाहेरून दरवाजाला कुलूप लावून झोपावे व सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाय योजना केल्या पाहिजेत. असा काही चोरीच्या घटना किंवा संशयस्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा. –
नारायण देशमुख पोलीस निरीक्षक, (यवत ता. दौंड, पोलीस ठाणे)