Baramati Lok Sabha : जिथं पहिली एकत्र सभा व्हायची आता तिथं पडणार दोन मंडप! उद्या सुप्रियाताई तर परवा सुनेत्रा पवार कण्हेरीतून करणार प्रचाराला सुरुवात…

Baramati Lok Sabha : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर अजित पवार गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरल्या आहेत.
तसेच आज पुण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुप्रिया सुळेंचा बारामती तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ शुक्रवारी (ता.१९) रोजी कन्हेरीतून होणार आहे, तर २० एप्रिल रोजी सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू होणार आहे.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या शुभारंभाची माहिती दिली, तर किरण गुजर यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभाची माहिती दिली. पवार कुटुंबियांच्या कोणत्याही निवडणूकीची प्रचाराची सुरवात कन्हेरी येथून होते, यावेळी पवार कुटुंबातच फूट पडलेली असतानाही त्यात बदल झालेला नाही. Baramati Lok Sabha
मागील काही दिवसांपूर्वीच नियोजन केल्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांचा प्रचार कन्हेरी येथील मारुतीरायाला नारळ वाढवून सुरू केला जाणार आहे. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी २० एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. यावेळी महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे/