Pune Crime : सिंहगड रोडवर मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना, कारण ठरलं फक्त काडीपेटी…

Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. तसेच दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना शहरात घडल्या. मंगळवारी सायंकाळी, बुधवारी सकाळी आणि पुन्हा मध्यरात्री गोळीबाराच्या घटनेने पुणे हादरले.

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौकात गोळीबाराची घटना घडली आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात गणेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर माहिती अशी, पुण्यात सिंहगड रोडवर मध्यरात्री अडीच वाजता गोळीबार झाला. भूमकर चौकात गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गणेश गायकवाड यांच्या खांद्याला गोळी लागली आहे. क्षुल्लक कारणातून हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. Pune Crime

काडीपेटी मागितल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, पुणे पोलीस आयुक्तांकडून गुन्हेगारांची परेड घेत असतानाच जंगली महाराज रोडवर मंगळवारी गोळीबाराचा झालेला प्रयत्न आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गोळीबाराची घटना घडल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आता गुरुवारी पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने पुण्यात चाललंय काय असा प्रश्न विचारला जात आहे. कोयता गँग, ड्रग्ज प्रकरण यानंतर गोळीबाराच्या घटनांमुळे पुणे सातत्याने चर्चेत येत आहे.