धक्कादायक! वाढदिवसानिमित्त ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू

पंजाब : एका १० वर्षीय मुलीचा वाढदिवसानिमित्त ऑनलाइन ऑर्डर केलेला केक खाल्ल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातून समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मृत्यू झालेल्या १० वर्षीय मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी केक शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, अमन नगर, पटियाला येथे राहणाऱ्या काजलने सांगितले की, १० वर्षीय मानवीचा वाढदिवस २४ मार्च रोजी होता. वाढदिवसानिमित्त संध्याकाळी ६ वाजता एका कंपनीतून ऑनलाइन केक मागवला होता. जो सायंकाळी साडेसहा वाजता घरी पोहोचवण्यात आला.
त्यानंतर सायंकाळी ७.१५ च्या सुमारास केक कापण्यात आला. केक खाल्ल्यानंतर मानवी आणि तिच्या कुटुंबीयांची प्रकृती ढासळू लागली. तिला उलट्याही झाल्या. मुलगी रात्री झोपली.
सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांनी पाहिले की मुलीचा मृतदेह थंड पडला होता, त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे मुलीच्या घरच्यांवर मोठी शोककळा पसरली आहे.