दिल्लीत इमारतीला भीषण आग; पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू


नवी दिल्ली : एका ४ मजली इमारतीला आज (ता. १४) पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्यामुळे पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील शहादरा परिसरातील शास्त्रीनगर भागातुन समोर आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५.२२ च्या सुमारास गीता कॉलनीतील शास्त्रीनगर, सरोजिनी पार्क, गल्ली क्रमांक १३ येथील घर क्रमांक ६५ मध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली.ज्या इमारतीत आग लागली ती चार मजली असून तळमजल्यावर कार पार्किंग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पार्किंगमध्ये आग लागली आणि संपूर्ण इमारतीत धूर पसरला. रस्ता अरुंद असूनही अग्निशमन दलाच्या अधिका-यांना घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सर्व मजले शोधण्यात आले. तेथून तीन पुरुष, चार महिला आणि दोन मुलांना बाहेर काढून हेडगेवार रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, इमारतीत अडकलेल्या दोन मुलांसह नऊ जणांना पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून जवळच्या हेडगेवार रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!