Pune Crime News : दम देऊनही निलेश घायवळचे रिल्स व्हायरल, पुणे पोलिसांच्या आदेशाला ‘भाई लोकांच्या’ कार्यकर्त्यांची केराची टोपली..

Pune Crime News : दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी शहरातील सर्वच टोळी प्रमुख तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांना बोलावून परेड घेत सोशल मीडियावर गुन्हेगारांचं उदात्तीकरण करणाऱ्या रिल्स यापुढं टाकू नये असे आदेश दिले होते. मात्र असं असताना देखील पुणे पोलिसांच्या आदेशाला भाई लोकांच्या कार्यकर्त्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली.

सोशल मीडियावरील इंन्स्टाग्रामवर दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. गुन्हेगार, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स, व्हिडिओ, गुंडांनी किंवा गुंडांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करायचं नाही, अशी सक्त ताकीद पोलिसांनी दिली होती.
पुणे पोलिसांनी हे जाहीरपणे सांगून देखील काही तासातच गुन्हेगारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गुंड निलेश घायवळचे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणारे रिल्स अपलोड केल्याचे समोर आले आहे. Pune Crime News

कोण आहे निलेश घायवळ?
निलेश घायवळ हा गजा मारणेच्या टोळीत गुंड म्हणून काम करायचा. त्याच्यावर पुण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी करणं, परिसरात दहशत पसरवणं यासारख्या गुन्ह्यांची नोंद आहे. पुण्यातील कोथरुड परिसरातील सुतारवाडीत निलेश घायवळची दहशत होती. मात्र गजा मारणेशी बिनसल्यावर मारणे गॅंगने घायवळवर दोनदा हल्ले केले. त्याचं प्रत्युत्तर घायवळ टोळीने दिले.
अखेर दत्तवाडीत गुंड सचिन कुडलेची निलेश घायवळ आणि साथीदारांनी रस्त्यात पाठलाग करुन फिल्मी स्टाईलने हत्या केली.कुडलेच्या हत्येनंतर घायवळसह २६ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली. २०१९ मध्ये निलेश घायवळ तुरुंगातून सुटला. बाकी गुन्ह्यातदेखील घायवळला जामीन मिळाला आणि २०२३ मध्ये तो अखेर तुरुंगातून बाहेर आला.