Maharashtra Politics : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडेच, शरद पवार यांना मोठा धक्का….

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: हजेरी लावताना बघायला मिळाले. याशिवाय त्यांच्या गटाचे दिग्गज नेते या सुनावणीला हजर राहत होते. Maharashtra Politics

निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत.
याशिवाय ते प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल? याबाबत उत्सुकता होती. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निकालासारखाच निकाल दिला आहे.