दिल्लीत काय चाललयं ! दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच फरफटत नेले …!

नवी दिल्ली : 31 डिसेंबर 2022च्या रात्री अंजलीला एका कारने दिल्लीत सुमारे 12 किलोमीटरपर्यंत ओढून नेले आणि मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करत असताना दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनीही अशाच धक्कादायक घटनेचा अनुभव आला आहे. या घटनेविषयी स्वतःहा मालीवाल यांनी माहिती दिली आहे . त्यामुळे दिल्लीतील बिघडलेल्या गुन्हेगारी स्थितीने महिला असुरक्षित असल्याचे विदारक चित्र देशवासियांपुढे आले आहे.
आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास स्वाती मालीवाल रिअॅलिटी चेकसाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यावेळी हरीश चंद्र नावाचा व्यक्ती त्यांच्या बलेनो कारमधून मालीवाल यांच्याकडे आला आणि गाडीत बसण्याचा आग्रह करू लागला. स्वाती यांनी त्याला नकार दिल्याने त्याने गाडी पुढे नेली, पण नंतर यू टर्न घेऊन रस्त्याच्या कडेने चालवायला लागला. त्या व्यक्तीने पुन्हा त्यांच्याशी गैरवर्तन केल्यावर त्या त्याला पकडण्यासाठी कारच्या खिडकीजवळ पोहोचल्या होत्या.
त्यानंतर त्या व्यक्तीने कारची खिडकी बंद केली, त्यामुळे स्वाती यांचा हात त्यात अडकला. यानंतरही तो गाडी चालवत राहिला. कारचालकाने स्वाती यांना सुमारे 15 मीटरपर्यंत फरपटत नेले. स्वाती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 47 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.