loni kalbhor : लोणीकाळभोर पोलिस ठाणे विभाजनात मोठ्या त्रुटीच, वडकी, उरुळीदेवाची भागाला शहर पोलिस ठाण्याची गरज भासणार .!!

जयदीप जाधव

loni kalbhor उरुळीकांचन : पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत लोणीकाळभोर पोलीस ठाणे अंकित उरुळीकांचन पोलीस चौकीचे नव्याने पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस अंतर्गत स्वतंत्र उरुळीकांचन पोलीस ठाण्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आले. लोणीकाळभोर पोलीस ठाणे हद्दीतील वाढलेला भाग, वाढती लोकसंख्या, नागरीकरण तसेच वाढती गुन्हेगारी यादृष्टीने नविन पोलीस ठाणे करण्याची आवश्यकता निर्माण झालेली होती. ती आता उरुळीकांचन पोलिस ठाण्याचा निर्मितीने पूर्ण झाली आहे.
पुणे ग्रामीण जिल्हयात सध्या ३२ पोलीस ठाणी कार्यान्वित असून नविन उरुळीकांचन पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे आता कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या ३३ झालेली आहे. उरुळीकांचन निर्मितीने पूर्वीच्या लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे तिसऱ्यांदा विभाजन झाले आहे. त्यामुळे एकेकाळी पुणे जिल्ह्यात नव्हे तर राज्यात गुन्हेगारी कारवायांत चर्चेत राहिलेले पोलीस ठाणे आता मर्यादीत स्वरूपात राहिले आहे.

लोणीकाळभोर पोलीस ठाण्याची हद्द पुणे -नगर रोड वाघोली ,लोणीकंद ते पेरणे, पुणे-सोलापूर रोड महादेवनगर मांजरी ते उरुळीकांचन, पुणे-सासवड रोड फुरसुंगी, भेकराईनगर ते दिवे घाट अशा क्षेत्रफळाने व्यापले होते. मात्र वाढलेली लोकसंख्या, शहरीकरण यामुळे लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे तिसऱ्यांदा विभाजन झाले आहे. एकंदरीत आता उरुळी कांचन पोलीस ठाण्यानंतर आणखी एक शहरी पोलिस ठाणे निर्माण होते की काय म्हणून शासन स्तरावर निर्णय होणे आवश्यक आहे.

लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातून लोणीकंद स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण झाले. त्यानंतर मांजरी बुद्रुक , भेकराईनगर , फुरसुंगीचे हा हद्दीचा भाग पुणे शहरात म्हणजे हडपसर पोलीस ठाण्यात सामाविष्ट झाला आहे. तर आता लोणीकाळभोर पोलिस ठाण्यातून उरुळीकांचन हे स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण झाले आहे.
वास्तविक लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचा विस्तार व लोकसंख्या पाहता २०१४ , २०१८ २०२१ या वर्षांत नविन स्वतंत्र उरुळीकांचन, लोणीकाळभोर व उरुळीदेवाची वडकी भागासाठी नविन पोलीस ठाणे होणे गरजेचे होते. परंतु ते न झाल्याने लोणीकाळभोर पोलीसांवर पुणे शहर पोलीस ठाण्याची हद्द मोठी झाल्याने तसेच वाढती लोकसंख्या, नागरीकरण व गुन्हेगारी यामुळे नियंत्रण ठेवणे व लोकांना चांगली सुविधा पुरविणे जिकरीचे झालेले होते. त्यामुळेच पूर्वेकडील ग्रामीण भाग मिळून ग्रामीण भागाला नवीन पोलिस ठाण्याची मंजुरी मिळाली.
त्यातच उरुळीकांचन व परिसरातील वाढती गुन्हेगारी, चोऱ्या व वाहतुक समस्या उरुळीकांचन चौकीतील अपुऱ्या पोलीस बळामधून नियंत्रित करण्यात आलेले अपयश यामुळे पत्रकार व लोकप्रतिनिधी यांचेकडून वेळोवेळी स्वतंत्र उरुळीकांचन पोलीस ठाणे निर्माण करणेसाठी होत असलेली मागणी, पाठपुरावा व प्रसंगी आंदोलनाची तयारी यामुळे शासनाकडून स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीस मंजुरीची मोहोर उठू शकली.
परंतु अत्यंत खाईगडबडीत झालेल्या निर्णयात नवीन उरुळीकांचन पोलीस ठाणे अंतर्गत उरुळीकांचन, सोरतापवाडी, नायगाव, पेठ, कोरेगावमूळ, प्रयागधाम, भवरापूर, टिळेकरवाडी, खामगाव टेक, शिंदवणे, वळती ही ११ गावांचा समावेश करण्यात आला. वास्तविक लोणीकाळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन होताना लोणीकाळभोर व लोणीकंद या हद्दीतील आणखी हद्द वाढू शकली असती परंतु तसे न घडता मर्यादीत हद्दीत उरुळीकांचन पोलीस ठाण्यास मंजुरी मिळाली आहे. तर दुसरीकडे लोणीकंद व उर्वरीत लोणीकाळभोर या पोलिस ठाण्याचा भौगोलिक विस्तार कायम राहिला आहे. loni kalbhor
लोणीकाळभोर ठाण्यात ( शहर)अंतर्गत लोणीकाळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, तरडे, उरुळीदेवाची, वडकी, औताडे हांडेवाडी, होळकरवाडी ही १० गावे शिल्लक राहिलेली आहेत. वास्तविक पुणे-सासवड रोड लगतची उरुळीदेवाची, वडकी, औताडे हांडेवाडी, होळकरवाडी या गावांसाठी त्या भागासाठी पुणे शहर अंतर्गत नविन पोलीस ठाणे होणे अत्यंत्य गरजेचे आहे तसे घडले नाही.
पुणे जिल्हयातील गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध मुळशी तालुक्याच्या आधी हवेली तालुक्यातील उरुळीकांचन या गावाचा उल्लेख व्हायचा, परंतु मध्यंतर काळात उरुळीकांचन येथील टोळीयुध्दाच्या भडक्यामध्ये येथील नामचिन गुन्हेगारांचा झालेला अंत, काही मोक्का अंतर्गत जेलबंद व जेलमधून अटी शर्तीवर बाहेर आलेले यांनी गुन्हेगारीपासून अलिप्त राहण्याचा घेतलेला निर्णय, वाळू लिलाव बंदी व पोलीसांनी ठेवलेला वचक यामुळे या भागातील गुन्हेगारी ब-यापैकी संपुष्टात आलेली आहे.
परंतु या सदन भागातील वाढलेली जमीनीचे दर, प्लॉटींग यामुळे नव्याने डोकेवर काढणा-या गुन्हेगारीला वेळीच संपुष्टात आणण्यासाठी तसेच उरुळीकांचन सोलापूर महामार्गावर उड्डान पुल नसल्याने अपुरा पडणारा रस्ता त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी समस्या असे उरुळीकांचन पोलीसां समोर मोठे आव्हान ठरणार आहे.
जुने कर्मचाऱ्यांची गरज भासणार..
उरुळीकांचन पोलिस ठाणे निर्मिती झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी आपल्या कार्यातील पारदर्शक तेची चुणुक कायम ठेवली. त्यांनी पूर्वी या ठिकाणी काम केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक टाळली आहे. ठाण्याच्या हद्दीची खडानखडा माहिती व अवैध धंद्यांना खतपाणी बसू नये म्हणून अंकित गोयल यांनी नियुक्तित जुणे कर्मचारी टाळले आहे. परंतु या ठिकाणचा पूर्व इतिहास पाहता या ठिकाणी कर्तव्यनिष्ठ काही जुणे कर्मचाऱ्यांची नेमणूक गरजेची आहे.