Amravati News : जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी, अमरावतीत खळबळ..

Amravati News : रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून विदर्भ पिठावर निनावी पत्राद्वारे राम राजेश्वराचार्य महाराज यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
या पत्रामध्ये तुम्ही जे अयोध्या-अयोध्या करत आहात ते महागात पडेल, आज नाही तर उद्या तुमचा अंत निश्चित आहे, अशी धमकी पत्राद्वारे महाराजांना देण्यात आली आहे. जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना अयोध्या मंदिर ट्रस्टकडून श्रीरामाच्या मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठेसाठी विशेष निमंत्रण आले आहे.

त्यानंतर त्यांच्या अयोध्येत जाण्यासाठीची तयारी सुरु झाली होती. पण या दरम्यान, अचानक जीवे मारण्याच्या धमकीच्या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. Amravati News


आम्ही सर्व पदाधिकारी अयोध्येत जाण्यासाठीच्या तयारीत होतो. अचानक एक पत्र आम्हाला आढळून आले. ज्यामध्ये स्वामीजींच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा आशय आहे. या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता आम्ही तत्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली आहे. त्यानंतर आम्ही एसपींना भेटलो असल्याचे महाराजांच्या अनुयायांनी सांगितले आहे.
दरम्यान, संबंधित धमकीचं पत्र समोर आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील कुर्हा येथील पोलीस ठाण्यामध्ये जगद्गुरूंच्या अनुयायांनी तक्रार दाखल केली आहे. जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराज यांना तात्काळ प्रशासनाकडून पोलीस संरक्षण मिळावं यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विदर्भ पीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी आज निवदेन दिले आहे.