उरुळीकांचन ग्रामपंचायतीचे कारभाऱ्यांनी तब्बल दोन कोटींचे उत्पन्न बुडविले! बाजार लिलावात ग्रामपंचायतीला स्वफायद्यासाठी चुना! गाव कारभाऱ्यांवर कारवाईच्या निर्देशाने घरी बसण्याची येणार वेळ..!!!

जयदिप जाधव

उरूळी कांचन : पाणी पुरवठा योजनेच्या साठवणूक तलावाच्या उत्खननात मुरुम चोरी, शासकीय विकास निधींचा अपव्यय या कारनाम्यानंतर आता उरुळीकांचन ग्रामपंचायतीचे कारभारी बाजार लिलावाच्या तब्बल १ कोटी ९५ लाख २ हजार ५१० रुपयांचे ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडविण्यात चमकले आहे. आता ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांवर ग्रामपंचायतीचे कोट्यावधींचे उत्पन्न बुडविल्याचा ठपका ठेवल्याचा वर्षभरापासून कारवाईसाठी प्रलंबित असलेला अहवाल विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात आला आहे.
ग्रामपंचायत अधिनियमाच्या तरतूदीनुसार ग्रामपंचायतीचे उत्पन्न बुडविल्याप्रकरणी कारणीभूत ठरल्यास संपूर्ण ग्रामपंचायत मंडळावरच अपात्रतेची कारवाई होणार असल्याची ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद असल्याने उरुळीकांचन ग्रामपंचायतीचे संपूर्ण कारभारी मंडळ अपात्र ठरणार का ? म्हणून गावकारभाऱ्यांच्या कारनाम्याची नामुष्की गावावर ओढवणार असल्याची शक्यता बाळगली आहे.

जिल्ह्यात सर्वात नमुनेबाज कारभार म्हणून कायम चर्चेत असणाऱ्या उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या कारभारी मंडळाचा एक नवा प्रताप आता समोर आला आहे. ग्रामपंचायतीने बाजार मक्ता वसुलीसाठी केलेल्या लिलाव प्रक्रियेत ग्रामपंचायतीचे मूळचे उत्पन्न कमी करण्याचा धक्कादायक प्रकार केला होता. तीन वर्षांसाठी केलेल्या या लिलाव प्रक्रियेत ग्रामपंचायतीचे हित डावलून ग्रामपंचायत कारभाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेला धुडकावून परस्पर बाजार लिलावाची प्रक्रिया मंजूर केली होती.
तीन वर्षासाठी केलेल्या या नियमबाह्य लिलाव प्रक्रियेने आता ग्रामपंचायतीची संपूर्ण कार्यकारीनी मंडळ बरखास्त होण्याची ‘आवदसा’खाबूगिरीच्या धोरणाने ओढवणार धोका संभोवला आहे. ग्रामपंचायत कर उत्पन्नात ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न वाढविण्याच्या बदल्यात परस्पर हेतूपरस्पर सरपंच व सदस्य मंडळाने राबविलेल्या लिलाव प्रक्रियेत बाजारपेठतील उत्पन्न कमी झाल्याचे कारण दाखवून ग्रामपंचायतीला तीन वर्षात चक्क १ कोटी ९५ लाख २ हजार ५१० रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार चौकशी अहवालात समोर आला आहे. कारभाऱ्यांनी या लिलाव प्रक्रियेतून एकतर हा लिलाव आपल्या अधिपत्यात निच्चांकी किमतीत रहावा म्हणून ग्रामपंचायतीलाच गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका अहवालातून स्पष्ट झाला आहे.
उरुळीकांचन ग्रामपंचायतीने सन २०२२- २३ , २३ -२४ व २४ – २५ या काळातील गावातील आठवडे बाजार व दैनंदिन बाजार मक्ता वसुली लिलाव हा नियमबाह्य, मनमानी व कायदेशीर प्रक्रिया डावलून झाल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी नेमलेल्या चौकशी समितीने ठेवला आहे. परंतु चौकशी समितीने ठपका ठेऊन १ वर्षे उलटूनही या चौकशी अहवालात दोषी असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सदस्य मंडळावर सत्ताधारी पक्षाच्या दोन बड्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांच्या कृपेने हे कामकाज कारवाईविना दडपण्याचे कारस्थान उघड झाले आहे.
या दोषी प्रकरणातील सुणावणीत जिल्हा परिषदेचे खेटे घालणाऱ्या या कारभारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी वर्षाचा कालावधी लगावल्याने या प्रकरणाची कारवाई होत नसल्याने थेट मुंबई उच्च न्यायालयात तक्रारकर्ते व माजी उपसरपंच सुनिल कांचन यांनी धाव घेतल्याने जिल्हा प्रशासनात कारवाई अभावी दबलेली फाईल आता मुंबई उच्च न्यायालयाच्या चार आठवड्यांत कारवाई करण्याच्या निर्णयाने आता थेट विभागीय आयुक्तांकडे कारवाईसाठी पोहचली आहे. त्यामुळे आता राजकीय दबावात दबलेल्या या फाईलला निकालात काढणे हे जिल्हा प्रशासनास भाग पाडले आहे.
त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार या सदस्य मंडळावर कारवाईचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पाठविला आहे. त्यानुसार आता उरुळीकांचन ग्रामपंचायतीने २४/४/२०२२ रोजीच्या मासिक सभेत मंजूर केलेल्या आठवडे बाजार व दैनंदिन बाजार मक्ता व वसुलीचा ई -लिलाव नियमबाह्य पद्धतीने केलेल्या चौकशी समितीच्याअहवालानुसार कारवाईच्या रडारवर आला आहे. या प्रत्यक्षात मंजुर केलेला ठरावात ग्रामपंचायतीने यापूर्वीचा ई-लिलाव पध्दतीने निविदा माघवून केलेल्या लिलावाच्या निविदेपेक्षा कमी दरात मंजूर केल्याचा ठपका आहे.
चौकशी अहवालात काय ठेवलाय ठपका?
उरुळीकांचन ग्रामपंचायतीने २४/५/२०२२ रोजी मासिक सभेत मंजूर केलेली प्रक्रिया ही यापूर्वी मासिक सभा म्हणजे २३/५/२२ च्या सभेच्या इतिवृत्तात ठेवली नाही, सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळाने मंजूर केलेली लिलाव प्रक्रीया ग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन नियमबाह्य मंजूर केली आहे, दैनंदिन व आठवडे बाजार लिलाव प्रक्रिया करताना करवसुली, पावती पुस्तके छापली नसणे, नियम अटी डावलणे, नियंत्रणाची जबाबदारी असणारी नोंद वही नसणे, लिलावाची बोली कमी करुन प्रक्रिया पूर्ण करणे असे नियमबाह्य पद्धतीने कामकाज केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
गावकारभाऱ्यांनी कसे केले नुकसान!
उरुळीकांचन ग्रामपंचायतीचे राजकीय समिकरण पाहता, ‘आपणा काम बणता भाड मे जाये जनता’ या युक्तीप्रमाणे तरबेज असलेले काही कारभाऱ्यांनी आपले हित साधण्यासाठी आठवडे बाजार व दैनंदिन बाजार स्वार्थासाठी कमी उत्पन्नात लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्याची किमया साधली आहे. ग्रामपंचायतीने वर्षे १७ -१८ मध्ये केलेली लिलाव प्रक्रिया ४,६८,०००० केलेली प्रक्रिया २२- २३ वर्षासाठी १८३,२००० इतक्या कमी फरकाने केली आहे . १८-१९ मध्ये केलेली प्रक्रिया ५,१४,८०००० प्रक्रिया २३-२४ मध्ये २०,१५,२०० इतकी तर १९-२० मध्ये ५६,६२,८०० केलेली प्रक्रिया ३४,४६,०८० इतक्या कमी दरात करुन ३३ % फरकाने लिलाव कमी केला आहे.
या लिलावामुळे ग्रामपंचायतीचे तीन वर्षात १ कोटी ९५ लाख इतके उत्पन्न बुडाले आहे. तर यात आणखी भर म्हणून कोरोना काळात बाजार लिलावाची मुदत संपली असताना ७ महिने ग्रामपंचायतीचे कर्मचारी नेमून मक्ता वसुली केली आहे. मात्र दोन महिन्यांची करवसुली ही वसुली केली नसल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याने दोन महिन्यांच्या रक्कमेला कुठे पाय फुटले आहे असे दोषी अहवाल त्रुटी दिसून येत आहे.