मोठी बातमी! रेड अलर्टमुळे ‘या’ जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; प्रशासनाचा तातडीचा निर्णय


मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून कोकण, मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पावसाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन पालघर जिल्हा प्रशासनाने 2 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली आणि इतर उपनगरांमध्येही पावसाचा जोर कायम असून अनेक सखल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून मुंब्रा परिसरातील काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच ते सहा दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि उपनगरांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!