WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट

पुणे : व्हॉट्सॲपने अलीकडेच वापरकर्त्यांसाठी युजरनेम फीचर आणण्याची तयारी सुरू केली आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक शेअर न करता केवळ युजरनेमच्या माध्यमातून इतरांशी संपर्क साधता येणार आहे. मात्र, हे फीचर सुरू होण्यापूर्वीच केंद्र सरकारकडून त्याची तपासणी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या फीचरचा गैरवापर होऊ शकतो का, याची सरकारकडून छाननी केली जाऊ शकते. तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन किंवा सुरक्षेसंदर्भातील त्रुटी आढळल्यास मेटा कंपनीला नोटीस पाठवण्याचाही पर्याय सरकारकडे असू शकतो.
व्हॉट्सॲपचा दावा आहे की, या फीचरमुळे वापरकर्त्यांची गोपनीयता अधिक मजबूत होईल. मात्र, युजरनेम वारंवार बदलण्याची सुविधा उपलब्ध असल्यास संशयित व्यक्तींचा मागोवा घेणे कठीण होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

या फीचरमध्ये व्हॉट्सॲप खाते तयार करण्यासाठी आणि ओटीपी पडताळणीसाठी मोबाईल क्रमांक पूर्वीप्रमाणेच आवश्यक राहणार आहे. मात्र, इतर वापरकर्त्यांशी संपर्क साधताना मोबाईल क्रमांकाऐवजी युजरनेमचा वापर करता येणार आहे.

टेलिग्रामसारख्या काही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अशी सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. भारतात हे फीचर सुरू करण्यापूर्वी त्याची कायदेशीर आणि सुरक्षा दृष्टीने तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो.