लाडक्या बहिणींना सर्वात मोठा झटका! 80 लाख महिला अपात्र; मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम…


पुणे : दरमहा खात्यात जमा होणाऱ्या 1500 रुपयांच्या मदतीची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर पडताळणी मोहीम राबवण्यात आल्यानंतर तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला दोन कोटींहून अधिक लाभार्थी असलेल्या या योजनेतील पात्र महिलांची संख्या आता लक्षणीयरीत्या घटली आहे. याचवेळी मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, याची उत्सुकताही लाभार्थी महिलांमध्ये वाढली आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी सुरू करण्यात आली होती. जुलै 2024 मध्ये योजनेची घोषणा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिलांनी अर्ज केले होते. सुरुवातीला लाभार्थींची संख्या सुमारे 2 कोटी 46 लाखांपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतर सरकारने ई-केवायसी आणि पात्रता पडताळणीची मोहीम सुरू केली. या प्रक्रियेत अनेक लाभार्थींची माहिती तपासण्यात आली.

ई-केवायसी करताना काही महिलांकडून तांत्रिक चुका झाल्याने त्यांना दुरुस्तीसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देऊन सरकारने सर्व लाभार्थींना संधी उपलब्ध करून दिली. मात्र मुदत संपल्यानंतर झालेल्या अंतिम तपासणीत सुमारे 80 लाख महिला योजनेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळून आले. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नव्हती, तर काहींची कागदपत्रे आणि उत्पन्नाशी संबंधित माहिती अटींशी सुसंगत नसल्याचे समोर आले.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. याशिवाय सरकारने निश्चित केलेल्या इतर पात्रता अटींची पूर्तता करणेही बंधनकारक आहे. या सर्व निकषांच्या आधारे लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली आणि त्यानुसार अंतिम यादी निश्चित करण्यात आली.

दरम्यान, लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारवरील आर्थिक भारही कमी होणार आहे. सध्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते. मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेतून केवळ 500 रुपये मिळतात.

मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते मे महिन्याच्या मध्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती. मात्र मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाखो महिलांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पडताळणीनंतर समोर आलेली ही आकडेवारी ‘लाडकी बहीण’ योजनेतील सर्वात मोठी छाटणी मानली जात असून, योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यावर सरकारचा भर असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!