आंबेनळी घाटात 8 मुलं गेली, सांत्वन करताना उदयनराजेही गहिवरले, पाणावलेल्या डोळ्यांनी कुटूंबाला एक शब्द दिला, म्हणाले…


सातारा : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार 1200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली. अनेक तास चाललेल्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी कुटूंबाने आक्रोश केला. हे सर्वजण दापोली येथील हर्णे येथे फिरण्यासाठी गेले होते. शनिवारी रात्री परत येत असताना त्यांची गाडी दाभिळ गावाजवळ त्यांची कार दरीत कोसळली.

यामध्ये गाडीतील आठ जणांचा मृत्यू झाला होता. यापैकी पाच तरुण हे साताऱ्याच्या आसगावमधील होते. या तरुणांच्या कुटुंबीयांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आसगावमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी उदयनराजे देखील गहिवरून गेले. त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू आले.

उदयनराजे पोहोचले तेव्हा मृतांच्या नातेवाईकांना भरून आलं, त्यांनी राजेंना पाहून हंबरडा फोडला. मृतांपैकी एका कुटुंबातील व्यक्तीच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी या सगळ्यांचे सांत्वन केले. अपघातात मृत्यू झालेल्यापैकी सहा तरुण एकुलते एक होते. यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले भावूक झाले.

यावेळी ते म्हणाले, मी तुमच्या मुलाची जागा घेऊ शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा राहीन. स्वतःला कधीच एकटे समजू नका. तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा, मी कायम तुमच्या सोबत आहे, असे म्हणत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला.

दरम्यान, मृतांपैकी एक रितेश लोखंडे याचे वडील रविवारी दिवसभर आपल्या मुलाला फोन करत होते. 50-60 वेळा कॉल करुनही तो फोन उचलत नसल्याने त्यांनी आपले नातेवाईक आणि पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर या सर्वांची मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आली. यावेळी ही घटना समजली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!