३० झाडे,२६ पोल , ५ रोहित्रे जमीनदोस्त ! न थकता भर पावसात १५ तासांत २० गावांचा खंडीत पुरवठा सुरू ! उरुळीकांचन महावितरण विभागाची प्रयत्नांची पराकाष्ठा….


उरुळी कांचन : वीजांच्या कडकडाटांसह परतीच्या पावसाने उरुळी कांचन लोणी काळभोर, थेऊर, कदमवाकवस्तीसह परिसराला रविवारी (दि. 14) मध्यरात्री चांगलेच झोडपले होते. या पावसात 30 झाडे, 26 पोल, 5 हून अधिक रोहित्र जमीनदोस्त झाले होते. तर अनेक ठिकाणी तारा तुटल्याने 20 हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. या मुसळधार पावसात महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत अंगावर पाऊस झेलत एका दिवसाच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत करून कमाल दाखविली आहे.

पूर्व हवेलीला वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. रायवडी, रामदरा, पाटील वस्ती, सिदराम मळा व बाजार मळा परिसरात 7 हून अधिक पोल जमिनीवर पडले होते. काही ठिकाणी पोल वाकलेले आढळून आले होते. तर अनेक ठिकाणी तारा तुटल्या होत्या. 20 ते 30 झाडे तारांवर पडली होती. त्यामुळे सोमवारी (दि.15) सकाळपासुन या ठिकाणची दुरुस्तीची कामे सुरू केली. झाडे हटविण्याचे व पोल उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.   महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व विद्युत पुरवठा सुरळीत केला.

लोणी काळभोर महावितरण शाखेचे सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ, वरिष्ठ तंत्रज्ञ बाळासाहेब सायकर, लाईनमन पी एस खरमाटे, वरिष्ठ तंत्रज्ञ मुस्तफा शेख, अमोल शेलार, अक्षय पाटील, तंत्रज्ञ अजय डोंगरे, सिराज सय्यद,अबू सय्यद, दादा चौधरी, योगेश गिरी, पांडुरंग खरात व रोहित काळभोर यांनी भर पावसात काम केले आहे. व नागरी वस्तीतील विद्युत पुरवठा टप्याटप्याने चालू केला आहे.

थेऊर-कोलवडी परिसरात दोन रोहित्र जमिनीवर पडले होते. गाव शिवाराच्या परिसरात 5 पोल पडले होते. वरिष्ठ कार्यालयाकडून सामग्री मागवून पावसाचा जोर कमी होताच कामाला सुरवात केली. सोमवारी (ता.15) सायंकाळी पाच वाजता त्या ठिकाणाचा वीज पुरवठा पूर्वरत करण्यात आला. तर कुंजीरवाडीत दोन पोल पडले होते. त्यामुळे तेथील विद्युत पुरवठा सर्वात अगोदर सुरळीत झाला. तर अष्टापुर, कोरेगाव मूळ, हिंगणगाव, भवरापूर, खामगाव टेक, शिंदेवाडी या गावांचा देखील वीजपुरवठा खंडित झाला होता. या ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे 22 केव्हीचे एकूण 10 पोल पडले होते. महावितरणचे कर्मचारी गणेश धुमाळ, स्वप्नील गायकवाड, बालाजी मुरकुटे व पप्पू कोतवाल यांनी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काम करून विद्युत पुरवठा सुरु केला.

दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज आल्याने उरुळी कांचन महावितरण शाखेने ओढे, नाले व शेतीसाठी जाणारा विद्युत पुरवठा अगोदरच बंद केला होता. परंतु, मुसळधार पावसामुळे दोन पोल कोसळले होते. तर 20 ठिकाणी तारा तुटल्या होत्या. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत बॉक्सची जागा बदलली. व नागरिकांच्या घरातील पाणी निघाल्यानंतर विद्युत पुरवठा चालू केला. यासाठी महावितरणचे सहाय्यक अभियंता तुषार होनमाने, नीलकंठ शिंदे, विक्रम बोरगल, जगदीश कानतोडे, अनिल महाजन या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेवून विद्युत पुरवठा सुरु केला.

कर्मचाऱ्यांचे होतेय सर्वत्र कौतुक

ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले की, आमच्या घरात पाणी आले आहे. मीटर पर्यंत पाणी आलेले आहे. कृपया वीज पुरवठा चालू करू नका. त्यामुळे अशा परिस्थितीत कुठेही वीज चालू राहणार नाही याची काळजी महावितरणकडून घेण्यात आली. तसेच पाण्याचा साचलेला भाग कोरडा झाल्यानंतर सर्व ठिकाणाचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला. त्यामुळे पडत्या पावसात जिवाची बाजी लावून काम करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या पडझडीत महावितरणाचे 20 ते 30 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र महावितरणाच्या उपविभागातील सर्वच कर्मचाऱ्यांनी कार्यतत्परता दाखविल्याने लवकर विद्युत पुरवठा सुरु झाला आहे. त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. सुदैवाने या पावसात कुठलीही दुर्घटना घडली नाही ही एक चांगली बाब आहे अशी प्रतिक्रिया  -महेश धाडवे (उपकार्यकारी अभियंता  : उरुळी कांचन महावितरण उपविभाग) यांनी व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!