मित्राच्या वाढदिवसाला जाणं ठरलं शेवटचं! कारसमोर फटाके फोडण्यावरून ठिणगी, २७ वर्षीय बॉबीची रक्तरंजित हत्या; नागपुरात नेमकं काय घडलं?


नागपूर : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अमन ऊर्फ बॉबी सपाटे (२७) याचा प्रवास रक्तरंजित घटनेने संपला. कारसमोर फटाके फोडण्यास विरोध केल्याने सुरू झालेल्या वादातून तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चाकूचे वार झाल्याने बॉबीचा मृत्यू झाला. नागपुरातील देवनगर परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

बॉबी हा हुडकेश्वर परिसरात राहत होता आणि हल्दीराम येथे कामाला होता. त्याचा मित्र अक्षय गंगाधर नौकरकर (३१) याचे देवनगरमध्ये ‘साईबाबा डेकोरेशन’ नावाचे दुकान आहे. दिवाळीनिमित्त त्याने टीव्हीएस शोरूमसमोर तात्पुरते फटाक्यांचे दुकान सुरू केले होते. सोमवारी अक्षयचा मित्र प्रसाद राऊत (२७, रा. देवनगर) याचा वाढदिवस असल्याने बॉबी रविवारी रात्री आठच्या सुमारास अक्षयच्या दुकानात त्याला भेटण्यासाठी आला होता.

मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बॉबी आणि अक्षय नौकरकर कारने प्रसादच्या घरी जाण्यास निघाले. याचवेळी अक्षय मडावी (२८, रा. पांढराबोडी) आणि त्याचे साथीदार कारसमोर फटाके फोडत होते. बॉबीने त्यांना अडवले असता मडावीने शिवीगाळ करत त्याच्या गालावर चापट मारली. यामुळे बॉबी कारमधून खाली उतरला आणि काही अंतरावर मडावीला गाठून चापट मारण्याचे कारण विचारले.

मात्र, वाद मिटण्याऐवजी परिस्थिती आणखी चिघळली. मडावीने आपल्या साथीदारांना आवाज दिल्यानंतर सुजल आणि समीर तेथे आले. तिघांनी मिळून बॉबीला मारहाण केली. याच दरम्यान मडावीने चाकूने बॉबीच्या पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या बॉबीचा मृत्यू झाला. या प्रकरणी अक्षय मडावी, सुजल आणि समीर या तिघांविरुद्ध बजाजनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अक्षय मडावीविरुद्ध खुनासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याला यापूर्वी स्थानबद्धही करण्यात आले होते. या हत्याकांडाची दखल घेत पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी बजाजनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतन चौहान यांची तातडीने पोलिस मुख्यालयात बदली केली. निरीक्षक शिंदे यांच्याकडे ठाण्याचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, याच परिसरातील देवनगर चौकात रविवारी रात्री टीव्हीएस वाहनांच्या शोरूमला फटाक्यांमुळे आग लागली होती. या आगीसाठी अक्षय मडावीने फोडलेले फटाके कारणीभूत होते का, याचाही तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे एकीकडे फटाक्यांवरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, तर दुसरीकडे शोरूमला लागलेली आग, या दोन्ही घटनांमधील संबंध तपासण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!