“२५ दिवस पोलिसांना चकवा, आता घरावर बुलडोझरची टांगती तलवार!” निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप; नगरसेवक मतीन पटेल अडचणीत


नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवली असतानाच आता या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल आता गंभीर अडचणीत सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्यांच्या घर आणि कार्यालयावर नोटीस चिटकवल्याने आता त्यांच्या मालमत्तेवर बुलडोझर फिरणार का, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

टीसीएस बीपीओ कार्यालयातील कथित सक्तीचे धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात निदा खान ही प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला पोलिसांनी विशेष पथकाच्या संयुक्त कारवाईतून छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती. विशेष म्हणजे, ती तब्बल २५ दिवस पोलिसांना चकवा देत होती. या काळात एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.

या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने २ मे २०२६ रोजी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध अधिक तीव्र केला आणि अखेर तिला अटक करण्यात यश आले. आता निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांच्यावरही सहआरोपी म्हणून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर महापालिकेने मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर नोटीस लावली आहे. तीन दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर न दिल्यास संबंधित बांधकामावर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बुलडोझर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धर्मांतर, राजकीय आश्रय आणि फरार आरोपीला मदत या मुद्द्यांमुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आगामी काळात आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!