‘हा पठारावरचा आहे… संपवा याला!’; जयंतीच्या जल्लोषात २२ वर्षीय शुभमचा बळी, पुण्यात टोळीयुद्धाचा थरार

पुणे : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा धक्कादायक वळण घेतले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या उत्साहात सुरू झालेल्या कार्यक्रमाला काही क्षणांत हिंसाचाराचे गालबोट लागले आणि त्यातून एका २२ वर्षीय तरुणाचा जीव गेला. डीजेवर नाचण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद जुनी गँगबाजी, एरियावर्चस्व आणि वैमनस्यामुळे इतका चिघळला की, एका तरुणाला १५ जणांच्या टोळक्याने लक्ष्य करत बेदम मारहाण केली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मृत तरुणाचे नाव शुभम राजू घोडके (वय २२) असे असून तो अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक पाहण्यासाठी सारसबाग परिसरात गेला होता. मिरवणूक आटोपल्यानंतर तो आपल्या मेव्हण्यासोबत घरी निघाला. वृंदावन नर्सरीजवळ दोघे थांबले असताना काही तरुण तेथे आले. त्यांनी शुभमला पाहताच “हा पठारावरचा आहे… मारा याला” अशी आरोळी दिली आणि काही क्षणांतच हल्ला सुरू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंतीच्या कार्यक्रमात डीजेवर नाचण्यावरून आंबेगाव पठार आणि तुकाईनगर परिसरातील दोन गटांमध्ये वाद झाला होता. हा वाद तात्पुरता शांत झाला असला तरी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून एका गटाने शुभमला लक्ष्य केले. १० ते १५ जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्या आणि हातातील वस्तूंनी त्याच्यावर अमानुष हल्ला केला. त्याचा मेव्हणा मध्ये पडल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.


मारहाणीनंतर शुभम आणि त्याचा मेव्हणा रिक्षाने घरी निघाले. मात्र वाटेत शुभमला तीव्र वेदना आणि त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांना बोलावण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, मात्र रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
घटनेनंतर सिंहगड रोड पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अनेक संशयितांची ओळख पटवली. या प्रकरणात ५ अल्पवयीन आरोपींसह एकूण १० जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध खूनासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक उत्सवांमध्ये किरकोळ कारणांवरून होणारी टोळीयुद्धे, तरुणांमधील वाढती गुंडगिरी आणि एरियावर्चस्वाच्या नावाखाली होणारा हिंसाचार ही चिंतेची बाब ठरत आहे. शहरातील अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.