१९ वर्षीय तरुणीने चालत्या बसमध्ये दिला बाळाला जन्म, नंतर नवजात बाळाला खिडकीतून…,घटनेने राज्य हादरले

परभणी : महाराष्ट्राच्या परभणीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणीने चालत्या स्लीपर कोच बसमध्ये बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर लगेचच, स्वतःला तिचा पती म्हणवणाऱ्या व्यक्तीसोबत मिळून त्या नवजात अर्भकाला खिडकीतून बाहेर फेकले, ज्यात त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितिका ढेरे नावाची महिला अल्ताफ शेख नावाच्या व्यक्तीसोबत संत प्रयाग ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच बसमधून पुण्याहून परभणीला जात होती. महिलेच्या सोबत असलेला व्यक्ती तिचा पती असल्याचा दावा करत होता.
प्रवासादरम्यान, महिलेला लेबर पेन सुरू झाले आणि त्यावेळी तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र, त्या जोडप्याने आपल्या नवजात बाळाला कपड्यात गुंडाळून खिडकीतून बाहेर फेकलं. दरम्यान, बसच्या चालकाने खिडकीतून काहीतरी फेकल्याचे पाहिल्यावर चौकशी केली असता, अल्ताफने सांगितले की, त्याच्या पत्नीला उलट्या होत असल्याने तिने उलटी बाहेर फेकली.

मात्र, त्याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका जागरूक नागरिकाने कापडात गुंडाळलेली वस्तू पाहिली आणि ते एक बाळ असल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी तात्काळ पोलीस हेल्पलाइन ११२ वर कॉल करून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच, गस्तीवर असलेल्या स्थानिक पोलिसांच्या पथकाने बसचा पाठलाग करून ती थांबवली. वाहनाची तपासणी आणि प्राथमिक चौकशीनंतर, पोलिसांनी रितिका आणि अल्ताफ या दोघांना ताब्यात घेतले. मुलाचे पालनपोषण करू शकणार नाही, या कारणावरून आपण बाळाला फेकून दिल्याची कबुली या दोघांनी दिली.
दरम्यान, पोलिसांच्या मते, ढेरे आणि शेख परभणीचे रहिवासी होते आणि मागील दोन वर्षांपासून ते पुण्यात राहत होते. अधिकाऱ्यांनी सांगितली की आरोपींनी एकमेकांचे पती आणि पत्नी असल्याचा दावा केला परंतु, याबाबत कोणतेच दस्ताऐवज सादर करण्यात आले नाहीत. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या उपचारासाठी तिला रुग्णालयात नेलं. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, परभणीच्या पाथरी पोलीस स्टेशन परिसरात आरोपी जोडप्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे