‘१२ लाखांचा मान, स्वच्छतेत पुण्याचा झेंडा उंच!’ जुन्नरच्या काळवाडीची विभागात बाजी; आता राज्यात अव्वल येण्याचे लक्ष्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काळवाडी ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२५-२६ मध्ये काळवाडीने संपूर्ण पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावत १२ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, लोकसहभाग तसेच शाश्वत विकास या सर्वच निकषांवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे काळवाडीने हा मान मिळवला आहे.
स्पर्धेचा निकाल विभागीय तपासणी समितीचे सदस्य-सचिव तथा पुणे महसूल विभागाचे अप्पर आयुक्त (विकास) प्रांजल शिंदे-चोभे यांनी जाहीर केला. यंदाच्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील जांबरे (ता. चंदगड) ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवत ९ लाखांचे, तर हिरलगे (ता. गडहिंग्लज) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावत ७ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले.

पुणे जिल्ह्याच्या कामगिरीत आणखी भर घालत राजगुरुनगर तालुक्यातील कडाचीवाडी ग्रामपंचायतीला उत्कृष्ट पाणी गुणवत्ता आणि प्रभावी जलव्यवस्थापनासाठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराअंतर्गत ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळणार आहे.

काळवाडीचे हे यश एका दिवसाचे नसून गेल्या १५ वर्षांच्या सातत्यपूर्ण विकासकामांचे फलित असल्याचे सरपंच तुषार शरद वामन यांनी सांगितले. गावात स्वच्छतेसोबतच जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामस्थांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीची घरपट्टी व नळपट्टीची दरवर्षी १०० टक्के वसुली होत असून, याच आर्थिक शिस्तीच्या जोरावर विकासकामांना गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील लक्ष्य राज्यस्तरीय स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवण्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.


विशेष म्हणजे, काळवाडी ग्रामपंचायतीच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतीला तब्बल २१ विविध पुरस्कार मिळाले असून, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील हा पाचवा मोठा सन्मान आहे. यापूर्वी पुणे विभाग, पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुका स्तरावरही काळवाडीने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी यांनी या यशामुळे ग्रामीण भागात स्वच्छता, जलसंवर्धन आणि लोकसहभागाच्या चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तर जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी काळवाडीसह सर्व विजेत्या ग्रामपंचायती, ग्रामस्थ आणि स्वच्छता अभियानात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, ही कामगिरी राज्यातील इतर गावांसाठी आदर्श ठरेल, असे म्हटले.
