“२१ जागा, अनेक दावेदार अन् राजकीय समीकरणांचा खेळ; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक अखेर जाहीर!”

बारामती : सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होणार असून, ७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ७ ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

२१ जागांसाठी कोणते प्रवर्ग?


निवडणुकीतील २१ जागांमध्ये उत्पादक सभासद प्रतिनिधींच्या १५ जागांचा समावेश आहे. याशिवाय ‘ब’ वर्ग सहकारी उत्पादक/बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थेसाठी १ जागा आहे. अनुसूचित जाती-जमातीसाठी १, महिलांसाठी २, इतर मागासवर्गीयांसाठी १ आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती/विशेष मागास प्रवर्गासाठी १ जागा राखीव आहे.
अर्ज दाखल झाल्यानंतर १५ सप्टेंबरला छाननी केली जाईल. १६ सप्टेंबरला वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर उमेदवारांना १६ ते ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल.
यानंतर २ ऑक्टोबरला अंतिम उमेदवार यादी जाहीर करून निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे कोणत्या जागेवर कोणामध्ये सामना होणार, याचे चित्र त्याच दिवशी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
११ ऑक्टोबरला सभासदांचा कौल
सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे. कारखान्याची अंतिम मतदार यादी यापूर्वीच २१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणुकीची घोषणा होताच आता संभाव्य उमेदवारांची चाचपणी, गटांच्या बैठका आणि मतदारांशी संपर्क वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः १५ उत्पादक सभासदांच्या जागांवर मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता असून, आरक्षित जागांसाठी कोणाला संधी मिळते, याकडेही लक्ष राहणार आहे.
अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवसापासून निवडणुकीची रंगत वाढणार असून, ३० सप्टेंबरनंतर प्रत्यक्ष मैदानात किती उमेदवार राहतात, यावर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. अखेर ११ ऑक्टोबरला सभासदांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याची उत्सुकता आता वाढली आहे.