पुणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार! बाह्य रिंगरोडच्या कामाला वेग; गेमचेंजर प्रोजेक्टची डेडलाईन ठरली

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या पुणे बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. ६९ किलोमीटर लांबीच्या या टप्प्याचे आतापर्यंत सुमारे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) ठेवले आहे. हा सहा ते आठ पदरी मार्ग डिसेंबर २०२७ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
१७० किमीचा रिंगरोड, ५२ हजार कोटींचा प्रकल्प
पुणे परिसरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सुमारे १७० किलोमीटर लांबीचा बाह्य रिंगरोड उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ५२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, कामाला नोव्हेंबर २०२४ मध्ये सुरुवात झाली. हा रिंगरोड पुणे परिसरातील नऊ राष्ट्रीय महामार्गांना जोडणार आहे.

रिंगरोडमुळे अवजड आणि लांब पल्ल्याच्या वाहनांना शहरात प्रवेश न करता बाहेरूनच पुढील प्रवास करता येणार आहे. पश्चिम टप्प्यासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रियाही जिल्हा प्रशासनाने वेगाने पूर्ण केली आहे.


पश्चिम टप्प्याचे पाच भागांत काम
पश्चिम टप्प्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी त्याचे पाच भाग करण्यात आले आहेत. या सर्व भागांमध्ये एकाचवेळी बांधकाम सुरू असून, कामाची सरासरी प्रगती सध्या ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. पावसाळ्यातही कामाचा वेग कायम असल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अजित पाटील यांनी दिली.
खडकवासला जलाशयावर ६४० मीटरचा पूल
पश्चिम रिंगरोडचा महत्त्वाचा भाग असलेल्या खडकवासला धरणाच्या जलाशयावर ६४० मीटर लांबीचा पूल उभारला जात आहे. हा संपूर्ण प्रकल्पातील सर्वांत मोठा पूल आहे. या परिसरात जलाशयाची खोली सहा ते बारा मीटर आहे.
समुद्रावरील पूल उभारणीच्या धर्तीवर पाइल फाउंडेशनच्या माध्यमातून पुलाचा पाया तयार करण्यात आला आहे. पुलाचे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, ऑगस्ट २०२७ पर्यंत पूल पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सिंहगडामागे ५.८ किमीचा बोगदा
पश्चिम रिंगरोडवरील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे सिंहगड किल्ल्याच्या मागील बाजूला तयार करण्यात येणारा ५.८ किलोमीटर लांबीचा बोगदा. या बोगद्याचे आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑक्टोबरपर्यंत बोगद्याचे खोदकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सुमारे २०० मीटर खोलीवर बेसॉल्ट खडकातून दररोज सरासरी चार मीटर खोदकाम केले जात आहे. बोगद्याची रुंदी १८ मीटर असून, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित बाहेर पडण्यासाठी दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेजची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिवरे ते उर्से असा मार्ग
पश्चिम रिंगरोड शिवरे येथून सुरू होऊन सिंहगडामागील बोगदा, खडकवासला जलाशयावरील पूल आणि हिंजवडीच्या पुढे पौड रस्ता ओलांडत उर्से येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे.
या मार्गामुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असून, अवजड वाहनांना शहरात न येता थेट बाहेरून प्रवास करता येईल. पश्चिम टप्प्यानंतर रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.