Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी विधानसभेची उमेदवारी मिळताच अजितदादांविरोधात पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार…

Yugendra Pawar : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.
तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाची पहिली ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, शिवसेना ठाकरे गटाप्रमाणेच शरद पवारांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवारांना तगडं आव्हान दिले आहे. सर्वाचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात थेट अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार म्हणजेच काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देत युगेंद्र पवार यांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे. दुसरीकडे विदर्भात मंत्री धर्मराव आत्राम यांच्याविरुद्ध त्यांच्या लेकीलाच शरद पवारांनी मैदानात उतरवलं आहे. अहेरी मतदारसंघातून भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. Yugendra Pawar
त्यामुळे, महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या लढाईत घड्याळाला तुतारीचं मोठं आव्हान निर्माण झाली. त्यातच, युगेंद्र पवार यांनी अजित पवारांवर तोफ डागली आहे. त्यामुळे, बारामतीमधील लढत रंगतदार आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत लक्षवेधी होणार आहे.
युगेंद्र पवार काय म्हणाले?
खरंतर पवारसाहेब व राष्ट्रवादी पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि विनम्रपणे हा निर्णय स्वीकार करतो. मला दिलेल्या संधीचं सोनं करीन, पवारसाहेबांना माझा अभिमान वाटेल असं काम मी करेन, असे युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. मुद्दे अनेक आहेत, बारामतीमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, २५ गावांत प्यायला पाणी नाही.
बेरोजगारीचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. शिक्षणात आपण जोर दिला पाहिजे. तसेच, भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारा प्रश्न मोठा आहे. बारामतीमध्ये वाढलेला भ्रष्टाचार, स्थानिक पातळीवरील हा भ्रष्टाचार वाढलाय तो संपवायचा आहे, असे म्हणत युगेंद्र पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर तोफ डागली आहे.