पुण्यात ‘फ्लॅट 403’चा मोठा भांडाफोड! विदेशी महिला, दिवसभर पुरुषांची वर्दळ; पोलिसांच्या छाप्यात उघड झालं मोठं कांड…

पुणे : पुणे शहरातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोहगावमधील पोरवाल रस्ता परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत सुरू असलेल्या अनैतिक प्रकाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

लोहगाव येथील ‘दुर्वा हेरिटेज’ सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रात्री छापा टाकत कारवाई केली.
या वेळी दोन विदेशी महिलांची सुटका करण्यात आली. या फ्लॅटमध्ये सतत पुरुषांची वर्दळ आणि संशयास्पद हालचाली सुरू असल्याने परिसरात आधीपासूनच चर्चा होती. अखेर पोलिसांच्या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोरवाल रोडवरील ‘दुर्वा हेरिटेज’ सोसायटीतील फ्लॅट नंबर ४०३ मध्ये गेल्या काही दिवसांपासून अनोळखी पुरुषांची वर्दळ वाढली होती. उच्चभ्रू वस्ती असल्याने सुरुवातीला कोणाला संशय आला नाही, मात्र लोहगाव पोलिसांच्या पथकाला येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे बुधवारी (१५ एप्रिल) रात्री पावणे आठच्या सुमारास पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकला.

पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता, तिथे युगांडा देशाच्या दोन महिला आढळल्या. या महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या दोन्ही पीडित महिलांची सुटका केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नामपिज्जा रिटाह (वय ३९, रा. युगांडा) या महिलेला अटक केली आहे, जी या रॅकेटची मुख्य सूत्रधार होती. तसेच, वानवडी येथील घरमालक रूपेश रमेश पिवाल (वय ४०) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या मालकीचा फ्लॅट या अनैतिक कामासाठी उपलब्ध करून देऊन त्याने आर्थिक फायदा लाटल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.