विलीनीकरणाबाबत आधी नकार दिला, आता अचानक चर्चा मान्य का? रोहित पवारांचा तटकरे, पटेलांना सवाल


मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

अजित पवार हयात असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची चर्चा सुरू होती. ते आज असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आलेले दिसले असते, असे विधान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.

तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकेवर रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार म्हणाले की, अजित पवार असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो. मात्र, अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांसमोर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती आणि अजितदादांच्या मनातही असा विचार नव्हता, अशी भूमिका मांडली होती.

मग आता अचानक दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचे ते का सांगत आहेत? अजितदादांच्या निधनानंतर त्यांनी ही वस्तुस्थिती का सांगितली नाही? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.

पक्षांतर्गत अडचणींमुळे भूमिका बदलली का?
सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या बदललेल्या भूमिकेवर बोलताना रोहित पवार यांनी त्यांच्या पक्षातील परिस्थितीवरही भाष्य केले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हे दोन्ही नेते सध्या अडचणीत असण्याची शक्यता आहे. पक्षात त्यांचे कितपत चालते, याबाबतही प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे स्वपक्षातील परिस्थितीमुळेच त्यांनी आपली राजकीय भूमिका बदलली असावी, असा दावा रोहित पवार यांनी केला.

भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवरही रोहित पवारांचे स्पष्टीकरण
दरम्यान, भाजपसोबत जाण्याच्या किंवा सत्ताधाऱ्यांशी सहकार्य करण्याच्या चर्चांवरही रोहित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही शरद पवार यांना जवळून ओळखतो. भाजपच्या धोरणांमुळे देशातील तरुण, महिला आणि शेतकरी अडचणीत आहेत. तसेच संविधानही धोक्यात असल्याची आमची भूमिका आहे.

या धोरणांविरोधात आम्ही सातत्याने लढा देत आहोत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा किंवा भाजपसोबत सहकार्य करण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवारही असा कोणताही निर्णय घेणार नाहीत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!