शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; एकनाथ शिंदेंनी घेतली रुग्णालयात भेट, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून खोकला आणि छातीतील संसर्गाचा त्रास कमी झाला आहे. सध्या त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली आहे.

शरद पवार यांना नियमित तपासणी आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना विविध राजकीय पक्षांतील वरिष्ठ नेते त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर असून खोकल्याचा त्रासही कमी झाला आहे. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना लवकरच डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सचिन अहिर आणि मिलिंद देवरा हे नेतेही उपस्थित होते. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची तब्येत चांगली असल्याचे सांगितले. तसेच, त्यांना उद्या डिस्चार्ज मिळू शकतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“शरद पवारांना भेटून आलो. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी मला दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी ही राजकीय भेट नसल्याचे स्पष्ट केले. शरद पवार यांनी महाराष्ट्रासह देशात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अशा ज्येष्ठ नेत्याची प्रकृती ठीक नसताना त्यांची भेट घेणे, हा कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.

“शरद पवार यांच्याशी माझे राजकारणापलीकडचे संबंध आहेत. राजकारणासंदर्भात काही प्रश्न असले तरी ते मला फोन करतात. आमचे कौटुंबिक संबंध आहेत,” असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!