यवत पोलिसांच्या चातुर्याने १२ तासांत आरोपी गजाआड ! यवत येथील कुटूंबावर हल्ला प्रकरणी परप्रांतीय चौघा तरुणांना अटक


यवत : दौंड तालुक्यातील यवत येथील बुधवारी रात्री झालेल्या एका कुटुंबावर हल्याप्रकरणी यवत पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळविले आहे. चोरीच्या उद्देशाने परप्रांतीय तरुणांनी या कुटूंबावर हल्ला करुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चार आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली आहे.

विश्वजीत शशिकांत चव्हाण (वय-३४ वर्ष, रा.यवत स्टेशन) याचा मृत्यू झाला असून उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री यवत रेल्वे स्टेशन जवळील नीलकंठेश्वर मंदिराशेजारी कुटूंबावर चोरीच्या उद्देशाने आरोपी हे या घरात शिरले व त्यांनी घरातील मयत विश्वजीत चव्हाण यांच्यासह कुटूंबातील चौघा सदस्यावर हल्ला चढविला.

हा हल्ला इतका गंभीर होता की, विश्वजित हे हल्याचा प्रतिकार करताना गंभीर मार बसून गतप्राण झाले. तर कुटूंबातील इतर सदस्य यांनाही हल्लेखोरांनी जबर मार दिल्याने जखमी झाले आहेत.

या हल्यात मयताचे वडील शशिकांत पांडुरंग चव्हाण, आई उज्वला शशिकांत चव्हाण व पत्नी प्राची वैभव यादव हे जखमी झाले आहेत.जखमींवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.याबाबत मयत विश्वजीत चव्हाण यांच्या पत्नी सारिका चव्हाण यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींचा शोध घेतला आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी दोघांना यवत तर अन्य दोघांना सासवड परिसरातून अटक केली आहे. त्यानुसार सलमान शेख (वय २८) मोमीन शेख (वय ४५) रावतसिंग तोमर (वय २६) गुलशन खान (वय २५) यांना अटक केली आहे.

वरील सर्व आरोपी उत्तर प्रदेश राज्यातील बागपत जिल्ह्यातील आहेत. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर,यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी प्रमुख भूमिका बजावली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!