मुलींना कोणी त्रास दिला तर यादवसाहेबांच्या मोबाईलवर फोन करा, रोडरोमिओंसाठी पोलीस निरीक्षक मैदानात…!

नगर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमियोंना अगदी हुडकून काढून कोतवाली पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. या मोहिमेत १८ जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे.
बारामती, भिगवण आणि त्यानंतर नगर जिल्ह्यातीलच कर्जत तालुक्यात कायद्याचा वचक निर्माण करणाऱ्या पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आता आपला दरारा नगर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीकडे वळवला आहे.
रोडरोमिओंकडून नगर येथील वाडीयापार्क परिसरात राहणाऱ्या महिला, फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, क्लासेससाठी येणाऱ्या मुलींना त्रास दिला जात होता. याबाबत अनेकदा तक्रारी दाखल केल्या आहेत.
मुलींच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या तसेच पाणी फेकणे तसेच वाडीयापार्क परिसरात दारु पिऊन तेथेच बाटल्या फेकणे तसेच मुलींचे पालक त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर त्यांचे अंगावर पाणी फेकणे अशा स्वरुपाचा त्रास देत होते. यामुळे मुली हैराण झाल्या होत्या.
यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मागदर्शनाखाली मोहिम हाती घेतली. सुरवातीला या परिसरातील विनाकारण फिरणाऱ्यांना कोतवाली पोलिसांकडून समज देण्यात आली.
गोंधळ घालणाऱ्या सोळा जणांवर मुंबई पोलीस कायदयाप्रमाणे खटले दाखल केले.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या ७७७७९२४६०३ या क्रमांकावर टेक्स मॅसेज अथवा व्हॉटसअप मेसेज करुन तक्रार करा असे आवाहन खुद्द यादव यांनी केले आहे. महिला व मुलींच्या मागे फिरणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, वारंवार फोन करणे, फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्रामवर वारंवार मेसेज करणे, प्रवासात वाईट उददेशाने स्पर्श करणे याबाबत कोणी त्रास दिल्यास आता कारवाई होणार आहे.