दिल्ली हादरली! २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार, रात्रभर कॅफेत धक्कादायक प्रकार; दोन महिलांसह तिघांना अटक

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रीत विहार परिसरातील एका कॅफेमध्ये रात्रभर सुरू असलेल्या पार्टीदरम्यान २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच कॅफेमध्ये काम करत होते. २३ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील प्रीत विहार येथील ‘सल्तनत कॅफे’मध्ये ही तरुणी आपल्या सहकाऱ्यांसोबत पार्टीसाठी गेली होती. रात्री ११.३० वाजता कॅफे बंद झाल्यानंतरही काही कर्मचारी आणि त्यांचे सहकारी कॅफेमध्येच थांबले होते. यावेळी पार्टी, मद्यपान आणि नृत्य सुरू होते.

कॅफेची चावी एका कर्मचाऱ्याकडे असल्याने पार्टी पहाटे सुमारे ३.३० वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर सर्वजण कॅफेबाहेर आले. याचदरम्यान दोन पुरुषांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तसेच इतर सहकाऱ्यांनीही या प्रकारात साथ दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.

दोन महिलांसह तिघांना अटक

पीडितेच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार चार पुरुष आणि दोन महिलांसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत दोन महिलांसह तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. विविध ठिकाणी छापेमारीही सुरू आहे.
पहाटेच पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार
ही तरुणी पहाटे ५.४५ वाजता पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने तक्रार दाखल केली. कॅफेबाहेर पडल्यानंतर ती एका पुरुषासह अन्य दोन महिलांसोबत गाडीतून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी तिची सविस्तर तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच मॅजिस्ट्रेटसमोरही तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
ऑगस्टमध्येही घडली होती धक्कादायक घटना
दरम्यान, यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी ग्रेटर नोएडामध्ये चालत्या बसमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी बसचालक कुलदीप आणि वाहक संदीप या दोघांना अटक केली होती. उत्तर दिल्लीतील तिमारपूर परिसरातील एका पार्किंगमध्ये ही घटना घडल्याची माहिती समोर आली होती. दिल्लीतील या दोन्ही घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
