नवऱ्यापासून विभक्त महिलेवर लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार ; कुंजीरवाडी येथील लॉजवर महिन्यापूर्वी घडलेला प्रकार उघड….

उरुळी कांचन : नवऱ्यापासून अलिप्त राहत असलेल्या परित्यक्ता महिलेशी शादी डॉट कॉम साईटवर ओळख केली. त्यानंतर एकांतात बोलण्याचा बहाणा करून भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका लॉजवर 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तसेच वारंवार शारिरीक संबंध ठेवण्यासाठी आरोपीने महिलेला धमकी दिल्याचाही प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंद्रकांत दिनकर थोरात (वय 30, चाकण, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीता या विवाहित असून त्या पतीपासून अलिप्त राहत आहेत. पिडीता व त्यांच्या दोन लहान मुलींसोबत यवत (ता. दौंड) येथे राहतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी फिर्यादी खाजगी नोकरी करतात. पतीपासून फारकत घेवून दुसरे लग्न करण्याचा विचार त्यांनी केला होता. पिडीता या शादी डॉट कॉम साईटवर योग्य जोडीदार शोधत होत्या. तेव्हा त्यांची आरोपी चंद्रकांत थोरात यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर आरोपीने पिडीतेचा विश्वास संपादन केला.. दोघेही एकमेकांना फोनवर बोलु लागले. पहिल्या पतीपासून फारकत घेतल्यानंतर लग्न करणार असे पिडीता यांनी थोरात यांना सांगितले होते.

दरम्यान, फोनवर बोलत असताना एक दिवस चंद्रकांत थोरात याने पिडीता यांना बोलावण्याचा बहाणा करून उरुळी कांचन (ता. हवेली) येथे भेटायला बोलावले. ठरल्याप्रमाणे दोघेही 24 ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास रोडवर भेटले. रोडवर काहीही एक बोलता येत नाही. आपण एकांतात जावून बोलुया. असे म्हणून थोरात याने पिडीता यांना त्याच्या शाईन गाडीवर बसविले. दोघे दुचाकीवर बसून पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाले. कुंजीरवाडीतील एका लॉजवर गेले.
गप्पा मारत असताना आरोपी हा पिडीतेशी शारिरीक जवळीक करु लागला. त्यानंतर चंद्रकांत थोरात याने पिडीतेकडे थेट शारिरीक सुखाची मागणी केली. यावेळी पिडीतेने लग्नानंतर आपण शारिरीक संबंध ठेवू असे सांगितले. त्यावेळी आरोपीने काही न ऐकता पिडीतेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने पिडीतेला वेळो वेळी फोन करून भेटण्यास बोलावू लागला व शारिरीक सुखाची मागणी केली आहे.
याप्रकरणी 25 वर्षीय पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी चंद्रकांत थोरात याच्यावर भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 64, 351 (2), 352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत आहेत.
